हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नागपूर जिल्ह्याचा ग्रामीण भाग व्यापणारा हा रामटेक लोकसभा मतदारसंघ (Ramtek Lok Sabha Election 2024)… जागतिकीकरणाची दारं ज्या पंतप्रधानांनी खुली केली त्या पी. व्ही. नरसिंहरावांनीही याच मतदारसंघातून प्रतिनिधित्व केलं होतं…काँग्रेसच्या पारंपारिक असणाऱ्या मतदारसंघावर 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच शिवसेनेचा भगवा फडकत राहिलाय…बाळासाहेबांनी पाय रोवून दिलेल्या रामटेकमध्ये विद्यमान खासदारांनी शिवसेनेच्या बंडाळीत शिंदेंना साथ दिली…त्यामुळे काँग्रेस विरुद्ध शिवसेना अशी परंपरागत पाहायला मिळणाऱ्या लढतीला यंदा कसा रंग मिळणार? विद्यमान शिंदे गटाचे कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांना खासदारकीची हॅट्रिक साधता येणार का? रामटेकमध्ये राम कुणाच्या पाठीशी उभा राहणार? हेच थोडंसं विस्ताराने समजून घेऊयात.
विदर्भातला अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा रामटेक लोकसभा मतदारसंघ…1957 साली मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून रामटेकवर काँग्रेसचं निर्विवाद वर्चस्व राहिलं…1984 आणि 1989 मध्ये सलग दोन टर्म या मतदारसंघातून भारताचे पंतप्रधान राहिलेल्या पी व्ही नरसिंहराव यांनी काँग्रेसच्या तिकिटावर विजय मिळवला…आणि महाराष्ट्राच्या राजकारणात रामटेकचा मतदारसंघ फोकसमध्ये आला…दत्ता मोघे, राणी भोसले यांच्या रूपाने यानंतर रामटेकला काँग्रेसचा खासदार मिळाला…मात्र विसाव्या शतकाच्या शेवटला बाळासाहेब ठाकरेंनी रामटेकचा मतदारसंघ ढवळून काढला.. त्यामुळे तब्बल 1999 पर्यंत काँग्रेसला तोड नसणाऱ्या या मतदारसंघात पहिल्यांदा शिवसेनेचा भगवा फडकला…सुबोध मोहिते यांना शिवसेनेचा रामटेक मधील खासदार होण्याचा पहिला मान मिळाला.. यानंतर मोहित्यांनी 2014 ची ही टर्म गाजवली…सलग एक दशक भाजपनं रामटेकवरची पकड काही निसटू दिली नाही…मग अशातच 2009 च्या निवडणुकीत मुकुल वासनिक यांनी पुन्हा एकदा रामटेक चा गड काँग्रेसला मिळवून दिला…यावेळेस शिवसेनेकडून निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या कृपाल तुमाने यांचा वासनिक यांनी पराभव केला…मात्र 2014 उजाडताना रामटेकच्या किल्ल्यावर शिवसेनेच्या भगव्या रंगाचं आभाळ दाटून आलं… राज्यमंत्री राहिलेले वासनिक यांना कृपाल तुमाने यांनी तब्बल 1,75,791 मतांनी पराभूत केलं. आणि तुमानेंनी 2009 च्या पराभवाची सल अखेर भरून काढली…हाच सिलसिला कायम ठेवत 2019 ची निवडणुकही तितकीच इंटरेस्टिंग ठरली… यावेळेस विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या विरोधात काँग्रेसकडून निवडणुकीच्या मैदानात उतरले होते सेवानिवृत्त आयएस अधिकारी किशोर गजभिये…
1957 साली अस्तित्वात आलेल्या रामटेकच्या मतदारसंघात साधारण 1,700 गावं येतात, म्हणजे नागपूर जिल्ह्यातला नागपूर शहर वगळता उर्वरित ग्रामीण आणि निमशहरी भाग. अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला हा मतदारसंघ सुरुवातीपासूनच काँग्रेसचा गड होता. रामटेक लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा येतात…रामटेक, कामठी-मौदा, उमरेड, हिंगणा, सावनेर आणि काटोल अशा या सहा मतदारसंघाची भौगोलिक व्याप्ती फार मोठी आहे…यापैकी दोन जागा काँग्रेसकडे, दोन जागा भाजपकडे, एक जागा शरद पवार गटाकडे तर एका जागेवर एकनाथ शिंदे समर्थित अपक्ष आमदार आहेत. यातील सावनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाल्यामुळे हा मतदारसंघ रिक्त आहे…
नागपूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे या मतदारसंघात काँग्रेस केडर मजबूत दिसतो…स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपची ताकद कमी झाली असली तरी, संपूर्ण लोकसभा मतदारसंघात भाजप तळागाळात पसरलाय…त्यामुळे शिवसेनेला खासदार निवडून आणण्यासाठी या मतदारसंघात भाजपची साथ महत्वाची असणारय.. त्यात हा मतदार संघ नागपूर शहराच्या आजूबाजूला असल्यानं मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्यासाठीही हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा ठरतो…
कृपाल तुमाने हे तिसर्यांदा खासदार होण्यासाठी उत्सुक असले तरी भाजपच्या मर्जीवर त्यांचे नशीब ठरणार आहे. जिल्ह्यात मर्यादित क्षमता असणार्या शिवसेनेची पालखी वाहण्याऐवजी यंदा भाजपचा खासदार निवडून आणू, अशी भाजप हायकमांडने भूमिका घेतल्याची चर्चा सध्या सुरु आहे…शेवटच्या वाटाघाटीत हा मतदारसंघ जर भाजपच्या वाट्याला आला तर कृपाल तुमाने उमेदवारीसाठी भाजपकडे उडी मारु शकतात. मात्र त्यांच्याबद्दल मतदारांमध्ये असलेल्या संभाव्य नाराजीचा फटका बसू नये, यासाठी भाजपने पर्यायी उमेदवाराची शोधा शोध करून ठेवलीय..यात उमरेडचे माजी आमदार सुधीर पारवे, जिल्हातील भाजप नेते अरविंद गजभिये यांच्या उमेदवारीची चाचपणी सध्या पक्षाकडून सुरू असल्याचे दिसतं…
उद्धव ठाकरे गटाने मात्र हा आपला मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला दिल्याचं जवळपास निश्चित आहे…त्यामुळे या जागेवर काँग्रेसकडून माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रश्मी बर्वे, नरेश बर्वे, तक्षशिला वाघधरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाचे अध्यक्ष कुणाल राऊत यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे…त्यामुळे विदर्भातल्या वाढत्या तापमानात सर्वात जास्त हाय व्होल्टेज ठरणाऱ्या या रामटेक लोकसभा मतदारसंघात नेमकं कसं गणित पाहायला मिळणार? कृपाल तुमाने भाजपच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा खासदार बनणार का? अवघ्या काही अंतराने पराभव स्वीकारावा लागणाऱ्या काँग्रेसला यंदा तरी अच्छे दिन येणार का? रामटेक मध्ये राम कुणाच्या पाठीशी उभा राहणार? हे आता पाहावे लागेल.