कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह गर्भवतीची प्रसुती यशस्वी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कोरोनाबाधित रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी आज आणखी एक थक्क करणारी यशस्वी कामगिरी करून दाखविली आहे. कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह म्हणून दाखल झालेल्या गलमेवाडी-कुंभारगाव (ता. पाटण) येथील २४ वर्षीय गर्भवती महिलेची सीझर प्रसुती करण्यात डॉक्टरांना यश आले आहे. या कोरोना पॉझिटिव्ह महिलेने आज दुपारी दीडच्या सुमारास एका गोंडस बाळाला जन्म दिला असून, त्याचे वजन पावणे तीन किलो इतके आहे. कोरोनाच्या महाभंयकर साथीतही डॉक्टरांच्या अथक प्रयत्नातून या बाळाचा जन्म झाला असून, बाळ आणि बाळाची आई अशी दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. अशाप्रकारे कोरोना पॉझिटिव्ह महिलेची यशस्वी प्रसुती होण्याची ही पश्चिम महाराष्ट्रातील पहिलीच घटना असून, कृष्णा हॉस्पिटलच्या या कामगिरीचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

मुंबईहून १५ दिवसांपूर्वी २४ वर्षीय गर्भवती गलमेवाडी-कुंभारगाव (ता. पाटण) येथे आली होती. तिच्यामध्ये ‘कोविड-१९’ची काही प्राथमिक लक्षणे दिसू लागल्याने तिला २२ मे रोजी कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी तत्काळ तिचा स्वॅब चाचणीसाठी पाठविण्यात आला. २३ मे रोजी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ती कोरोना पॅाझिटिव्ह आढळल्याने तिच्यावर तातडीने कोरोनाच्या उपचारास प्रारंभ करण्यात आला. दरम्यान, या गर्भवती महिलेवर स्त्री व प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. एन. एस. क्षीरसागर, डॉ. संजय पाटील, डॉ. मनिषा लद्दड व डॉ. आशुतोष बहुलेकर यांच्या देखरेखीखाली स्वतंत्र उपचार सुरू करण्यात आले.

या महिलेचा गर्भवती काळ पूर्ण झाला असल्याने आणि तिला उच्चरक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने कृष्णा हॉस्पिटलच्या डॉक्टर्सनी तत्काळ तिची सिझेरियनद्वारे प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास तिची सिझेरियनद्वारे यशस्वीपणे प्रसुती करण्यात आली. कोरोना पॉझिटिव्ह महिलेची प्रसुती यशस्वीपणे करण्यामध्ये स्त्री व प्रसुतीरोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष बहुलेकर, डॉ. रश्मीन साहू, डॉ. चिराग शर्मा, भूलतज्ज्ञ डॉ. माया कमलाकर, डॉ. निकिता लोले, डॉ. शालू शर्मा, बालरोगतज्ज्ञ डॉ. व्ही. वाय. क्षीरसागर, डॉ. सोहम क्षीरसागर, डॉ. साबू इब्राहीम, डॉ. सुकेश, डॉ. दुर्गाप्रसाद, नर्स जयश्री विटकर यांच्यासह अन्य निवासी डॉक्टर्स व नर्सिंग स्टाफचा समावेश होता.

या यशाबद्दल कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले आणि कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर यांनी हॉस्पिटलमधील स्त्री व प्रसुतीरोग विभाग आणि बालरोग विभागातील सर्व डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे कौतुक केले आहे. दरम्यान, नवजात बालकाचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला असून, त्याच्या अहवालाकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Satara

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment