कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती सुरु केली असुन कृष्णा कारखाना हा सॅनिटायझरची निर्मिती करणारा सातारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी साखर कारखाना आहे. सातारा सांगली जिल्ह्यातील पंचेचाळीस हजार सभासदांना यांचे मोफत वितरण होणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. या विषाणूच्या प्रतिबंधासाठी वापरण्यात येणार्या हॅन्ड सॅनिटायझरला प्रचंड मागणी वाढल्याने बाजारात त्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी त्याची चढ्या दराने विक्री केली जात असल्याने सर्वसामान्यांना हॅन्ड सॅनिटायझर मिळणे दुरापास्त झाले आहे. यावर तोडगा म्हणून आता रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने हॅन्ड सॅनिटायझरची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.
कृष्णा कारखाना हा सॅनिटायझरची निर्मिती करणारा सातारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी साखर कारखाना आहे. कारखान्यात तयार झालेले हे हॅन्ड सॅनिटायझर कारखान्याच्या सातारा सांगली जिल्ह्यातील ४५ हजार सभासदांना मोफत घरपोच वितरित केले जाणार असल्याची माहिती चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी दिली आहे.