औरंगाबाद – खुलताबाद तालुक्यातील राजाराय टाकळी सज्जाचे तलाठी कैलास कुबेर याने २५ हजार रुपयांची लाच याचिकाकर्त्याला मागितली. तडजोडीअंती यातील १५ हजार रुपये स्विकारताना त्याच्यासह एकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने रंगेहात पकडले. कैलास कुबेर आरोपी तलाठी कैलास तुळीराम कुबेर (ता. खुलताबाद) व राजेश तावजी बांडे (रा. राधास्वामी कॉलनी, जटवाडा रोड) याच्याविरुद्ध खुलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार राजाराय टाकळी येथील जमिनीचा वाद महसुल मंत्रालयात सुरू होता. या प्रकरणात १८ जुलै रोजी तक्रारदाराच्या विरोधात निकाल आला. या निकालाविरोधात त्यांनी औरंगाबाद खंडपीठात २३ ऑगस्ट रोजी अपील दाखल केले. त्या अपीलाची प्रत तलाठी, मंडळ अधिकारी आणि खुलताबाद तहसीलदार यांना दिली. त्यानंतरही तलाठ्याने मंत्रालयात लागलेल्या निकालाच्या अनुषंगाने विरोधी पक्षकारांच्या नावे फेरफार नोंद न करण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली.
त्यानंतर एसीबीच्या पथकाने खुलताबाद पंचायत समितीसमोर एसबीआय बँकेच्या बाजूला सापळा लावला. तक्रारदाराकडून लाचेच्या २५ हजार रुपयांपैकी १५ हजार रुपये कैलास कुबेर याने घेत खाजगी व्यक्ती राजेश बांडे याच्याकडे दिले. पैसे स्विकारताच सापळा लावलेल्या पथकाने दोघांना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, प्रभारी अपर पोलीस अधीक्षक रुपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक रेश्मा सौदागर, नाईक प्रकाश घुगरे, राजेंद्र सिनकर, अशोक नागरगोजे, चालक अंमलदार चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने केली.