इस्लामाबाद । पाकिस्तानच्या कैदेत असलेलं भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणी पाकिस्तानने आता मोठा दावा केला आहे. आपल्या शिक्षेविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्यास त्यांनी नकार दिला असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. हेरगिरी आणि दहशतवादविरोधी कलमांतर्गत पाकिस्तानच्या कोर्टाने कुलभूषण जाधव यांना फाशीची सुनावली असून पाकिस्तानच्या दाव्यामुळे खळबळ माजली आहे. दरम्यान, त्यांना दुसरा कॉन्सुलर अॅक्सेस देण्याचा प्रस्तावही दिल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, १७ जून रोजी कुलभूषण जाधव यांना पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र, त्यांनी नकार दिला. त्याऐवजी सध्या दाखल केलेल्या दया याचिकाच पुढे पाठवण्यात यावी असंही त्यांनी म्हटले. आंतरराष्ट्रीय कोर्टाने मागील वर्षी पाकिस्तानने जाधव यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यासाठी प्रभावी ‘समीक्षा आणि पुनर्विचार’ करण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. त्याशिवाय, जाधव यांना राजनयिकांची भेट घालून देणे आवश्यक असल्याचे म्हटले होते.
पाकिस्ताननं कुलभूषण जाधव याचे वडिल आणि त्यांच्या पत्नी यांना भेटण्याची परवानगी दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून कुलभूषण जाधव हे पाकिस्तानमधील तुरूंगात आहेत. तथाकथित हेरगिरी आणि दहशतवाद पसरवण्याच्या आरोपांवरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने एप्रिल २०१७ मध्ये कुलभूषण जाधव यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या निर्णयाविरोधात भारताने थेट नेदरलँडमधील द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. “जाधव यांच्या प्रकरणाचा आणि दिलेल्या शिक्षेचा आढावा घेऊन फेरविचार करण्यात यावा. तसेच विलंब न करता त्यांना भारतीय दूतावासाची मदत देण्यात यावी”, असे आदेश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते. ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तानमधून पाकिस्तानच्या सुरक्षा दलानं त्यांना अटक केल्याचा दावा केला होता. तर दुसरीकडे जाधव यांचं इराणमधूनच अपहरण केल्याचा दावा भारतानं केला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”