ठाणेकरांचा प्रवास अधिक आरामदायक आणि सुखद व्हावा, यासाठी ठाणे महापालिकेने टीएमटीच्या ताफ्यात 66 वातानुकूलित इलेक्ट्रिक बस समाविष्ट केल्या. यामुळे नागरिकांना उकाड्याच्या दिवसातही गारठवणारा प्रवास अनुभवता यावा, हा उद्देश होता. प्रारंभी या बस शहरातील विविध भागांत धावू लागल्याने ठाणेकरांमध्ये समाधानाचं वातावरण होतं.
मात्र, सध्या परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. शहरातील अंतर्गत मार्गांवर AC बस दिसेनाशा झाल्या आहेत, तर या बस मोठ्या प्रमाणावर लांबच्या म्हणजे बोरिवली, मिरारोड, मुलुंड अशा मार्गांवर धावत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, 66 बसांपैकी तब्बल 50 बस लांब पल्ल्याच्या मार्गांवर कार्यरत आहेत. परिणामी शहरातील दैनंदिन प्रवाशांना उकाड्यातही सामान्य (नॉन-AC) बसचा त्रासदायक प्रवास करावा लागत आहे.
नागरिकांची नाराजी वाढतेय
उन्हाच्या तीव्रतेमुळे प्रत्येक प्रवाशाला थंड बसची अपेक्षा असते. मात्र, थांब्यावर तासभर उभं राहूनही AC बस न येणं, ही आता ठाणेकरांची नित्याची तक्रार झाली आहे. शहरात केवळ 16 वातानुकूलित बस मार्गांवर धावत असून त्यातही काही विशिष्ट भागांपुरत्या मर्यादित आहेत – जसे की हिरानंदानी, वागळे सर्कल, पारसिक नगर आदी. बहुतेक भागांमध्ये नागरिकांना आजही गरम आणि गजबजलेल्या बसमधून प्रवास करावा लागत आहे.
टीएमटी प्रशासनचे स्पष्टीकरण
या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना परिवहन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, “लांबच्या मार्गांवर AC बस चालवताना त्या शहरातील काही थांब्यांवर थांबतात. त्यामुळे नागरिकांना या बसचा उपयोग करता येतो.”
तांत्रिक अडचणींमुळे सध्या या बस लांबच्या मार्गांवरच वापरल्या जात आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. मात्र, लवकरच शहरांतर्गत मार्गांवरही अधिक AC बस सुरू करण्याचे नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
ठाणेकरांच्या ‘गार’ प्रवासाचं स्वप्न सध्या तरी लांबच्या मार्गांपुरतं मर्यादित आहे. शहरात फिरणाऱ्यांना अद्यापही ‘साध्या’ बसचाच आधार घ्यावा लागत आहे. महापालिकेच्या पुढील निर्णयांकडे नागरिकांचे डोळे लागले आहेत.