हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ladki Bahin Yojana । राज्यातील लाडक्या बहिणींना सरकार आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. यापूर्वी सरकारी कर्मचारी असलेल्या महिलाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याचं निदर्शनास आल्यानंतर सरकार त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय. आता इन्कम टॅक्स विभागाकडून अनेक बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल होणार आहे. राज्यभरात नेमक्या लाडक्या बहिणी योजनेत पात्र महिलांची संख्या किती हे आता आयकर विभाग सरकारला सांगणार आहे. यासाठी राज्य सरकारचा केंद्राशी संपर्क सुरू आहे. या माहितीच्या आधारे अडीच लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या महिलांना या योजनेतून वगळले जाणार आहे.त्यामुळे ज्या महिला आयकर भरतात त्यांची नावे लाडकी बहीण योजनेतून आपोआप बाहेर पडतील.
महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi tatkare) यांनी यापूर्वीच सांगितले होते की, या योजनेचा लाभ २२०० हून अधिक अपात्र सरकारी कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. कोणत्याही योजनेच्या अंमलबजावणीतील पडताळणी ही नियमित प्रक्रिया असल्याचे त्यांनी ‘एक्स’ (X) माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले होते. या पडताळणी प्रक्रियेत २ लाख अर्जांची छाननी केल्यानंतर २२८२ सरकारी कर्मचाऱ्यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ घेतल्याचे आढळून आले. आता, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या लाभार्थी महिलांची पडताळणी करून त्यांना या योजनेतून बाहेर काढले जाणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी काय होत्या अटी ? Ladki Bahin Yojana
अर्जदाराचे वय 21 ते 65 वर्षे दरम्यान असावे
कुटुंबातील कोणत्याही सदस्याकडे ट्रॅक्टर वगळता चारचाकी वाहन असल्यास अपात्र.
कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन/उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक किंवा सदस्य असल्यास अपात्र.
सरकारी कर्मचारी (आउटसोर्स, स्वयंसेवी किंवा कंत्राटी कर्मचारी वगळता) अपात्र.
आत्तापर्यंत 2.30 लाख महिला या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असल्याने अपात्र झाल्या आहेत. 1.10 लाख महिला वय 65 वर्षांहून अधिक असल्याने अपात्र झाल्यात, 1.60 लाख महिला त्यांच्या घरी चारचाकी वाहनं असल्यामुळे अपात्र झाल्या आहेत. 7.70 लाख महिला नमो शेतकरी योजनेच्या लाभार्थ्या असल्याचे निदर्शनास आलं तर 2,652 महिला – सरकारी सेवेत कार्यरत असल्याने त्यांच्यावरही सरकार कारवाई करणार असल्याचं बोललं जातंय.




