हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेच्या (Ladki Bahin Yojana) अंतर्गत दीड हजार रुपयांचा तिसरा हप्ता पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे एकूण ३ हप्ते महिलांच्या बँक खात्यात जमा आले असून ४५०० रुपयांची आर्थिक मदत महिलांना मिळाली आहे. खरं तर या योजनेची घोषणा होताच विरोधकांनी इतके पैसे देणे शक्य नाही, राज्यावर कर्जाचा बोजा आहे असं म्हंटल होते, मात्र राज्यातील महायुती सरकार लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीवर ठाम राहिले. कोणत्याही परिस्थितीत ही योजना पूर्ण क्षमतेने राबवण्याचा निर्धार सरकारने केला आहे. त्यामुळेच 29 सप्टेंबर पासून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यावर तिसऱ्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
खरं तर हि योजना २१ ते ६५ वयोगटातील महिलांसाठी आणली आहे. त्यासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख हि सुरुवातीला 31 जुलै ठेवण्यात आली होती. मात्र महिलांचा उदंड प्रतिसाद पाहून 31 ऑगस्ट ही अंतिम तारीख निश्चित करण्यात आली. तरीही महिलांचा वाढता प्रतिसाद पाहून या योजनेसाठी नोंदणी सुरूच ठेवण्यात आली. आजअखेर दीड कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली असून त्यांना या योजनेचा लाभ मिळत आहे. लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्याचा प्रयत्न विरोधकांनी पुरेपूर केला. अर्थमंत्री अजित पवार यांनी या योजनेची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. मात्र विरोधकांनी तेव्हा नावे ठेवली होती.
काँग्रेस सरकार येताच ही योजनाच बंद करू, अशा घोषणाही झाल्या. विरोधातील अनेक आमदारांनी महिलांच्या नोंदणीस सुरुवात केली. बॅनरवर स्वतःचे फोटो लावले. आणि अर्जावर नेमकी चुकीची माहिती भरली. ही योजना पूर्णपणे बदनाम व्हावी, पात्र लाभार्थींना पैसे मिळू नयेत, हा एकमेव उद्देश त्यामागे होता. चुकीचा डाटा अपलोड करून या योजनेचे पोर्टल हँग करण्याचा प्रयत्न देखील विरोधकांनी केल्याचा आरोप होतोय. मात्र तरीही ऑफलाइन पद्धतीचा वापर करून राज्य सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली.
लाडकी बहीण योजना खूप कमी वेळेतच लोकप्रिय झाली. या योजनेची प्रचंड लोकप्रियता पाहून पोटदुखी सुरू झालेल्या विरोधकांनी न्यायालयात देखील दाद मागितली. मात्र न्यायालयाने या योजनेच्या विरोधातील याचिका फेटाळून लावल्या. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी कोणत्याही परिस्थितीत ही योजना बंद पडणार नाही, हे थेट जनतेत जाऊन सांगितले आहे. जनतेचाही आता सरकारवर विश्वास बसला असून या योजनेचा उदंड प्रतिसाद अद्यापही सुरू आहे.
महत्वाची बाब म्हणजे , एखादी योजना सुरू करताना राज्याच्या आर्थिक स्थितीचा समग्र आढावा घ्यावा लागतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे कारभार चालवण्याच्या बाबतीत अत्यंत तरबेज नेते आहेत. राज्याच्या तिजोरीवर कोणताही ताण येणार नाही याची दक्षता या तिघांनीही घेतली आहे. लाडकी बहीण योजनेच्या पूर्ततेसाठी अर्थसंकल्पातच 46 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर याचा कोणताही परिणाम होण्याची तीळमात्र शक्यता नाही. म्हणूनच राज्याचे आर्थिक आरोग्य सुदृढ ठेवून गरजू महिलांना लाभ देण्याच्या या योजनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.