Ladki Bahin Yojana| सध्या लाडकी बहिणी योजना राज्यामध्ये चर्चेचा भाग बनली आहे. आत्तापर्यंत या योजनेचे सहा हफ्ते महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे पुढचा हप्ता महिलांना कधी मिळेल हा प्रश्न वारंवार विचारला जात आहे. याबाबतचीच माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की, लाडकी बहिणी योजनेचा पुढील हप्ता हा 26 जानेवारीच्या आत महिलांना वितरित केला जाणार आहे.
यापूर्वी डिसेंबर महिन्याचा हप्ता 25 ते 30 डिसेंबरदरम्यान वितरित करण्यात आला होता. या योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांना नियमितपणे निधी मिळावा यासाठी महिला व बालविकास विभागाने आर्थिक नियोजन पूर्ण केले असून, जानेवारी महिन्यासाठी अर्थ विभागाकडून 3690 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळेच जानेवारी महिन्याचा डीबीटी लाभ 26 जानेवारीच्या आत महिलांना वितरित केला जाणार आहे.
अदिती तटकरे काय म्हणाल्या– Ladki Bahin Yojana
याबाबत बोलताना अदिती तटकरे म्हणाल्या की, “नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्याचा लाभ 26 जानेवारीपूर्वी पोहोचवण्याचे काम सुरू आहे. महिलांना तीन ते चार दिवसांत रक्कम त्यांच्या खात्यात जमा होईल. (Ladki Bahin Yojana) डिसेंबर महिन्यात 2 कोटी 47 लाख महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. जानेवारीतही हा आकडा जवळपास कायम राहील. मात्र, दुबार नावनोंदणी किंवा इतर योजनांचा लाभ घेतलेल्या महिलांनी आपली नावे काढून घेतल्याने लाभार्थ्यांची संख्या किंचित कमी होण्याची शक्यता आहे”
त्याचबरोबर , “अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरही लाभामध्ये खंड पडू नये यासाठी आम्ही कार्यरत आहोत.” असे तटकरे यांनी सांगितले. दरम्यान, या योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये देण्याच्या प्रस्तावावर अर्थसंकल्पात विचार केला जाणार आहे. असे झाल्यास गरजू महिलांना या योजनेमुळे मोठा फायदा होणार आहे.