कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या भेदा चाैकातील लक्ष्मी साॅ मिल या वखारीला भीषण आग लागली. मध्यरात्री 2 वाजता लागलेली ही आग पहाटे 6 वाजता आटोक्यात आणण्यात अग्निशामक दलाला यश आले. या आगीत लाकडांसह बखारीतील मशीनरीही जळून खाक झाल्या आहेत. या घटनेत वखार मालकाचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड शहरात भेदा चाैक ते उर्दू शाळा या दरम्यान असलेल्या वखारीला भीषण आग लागली. आगीने राैद्ररूप धारण केल्याने मध्यरात्री परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जमलेल्या लोकांनी कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला घटनेची माहिती दिली. तातडीने कराड पालिकेचे अग्निशामक दल दोन गाड्या घेवून घटनास्थळी दाखल झाले. त्याचसोबत सह्याद्री सहकारी साखर कारखान्यांची अग्निशामक गाडीही आग विझविण्यासाठी आलेली होती. अथक प्रयत्नानंतर पहाटे सहा वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
आग मोठ्या प्रमाणावर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लागल्याने बघ्यांची मोठी गर्दी होती. त्यांना हटविण्यासाठी व कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कराड शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या आगीत लक्ष्मी साॅ मिलमधील पत्र्याच्या शेड्यातील संपूर्ण लाकूड व मशीनरीही जळून खाक झाल्या. जळालेले साहित्य व मशिनरी हटविण्याचे काम परिसरातील नागरिकांनी सकाळी 9 वाजता हाती घेतले.