गडचिरोलीतील ग्रामसभांचे लढवय्या नेते लालसू नोगोटी अपघातात गंभीर जखमी

गडचिरोली प्रतिनिधी | रितेश वासनिक

ग्रामसभांचे सक्रिय कार्यकर्ते आणि भामरागडमधील जिल्हा परिषद सदस्य लालसू नोगोटी यांच्या दुचाकीला कारमपल्ली येथे अपघात झाला आहे. यामध्ये नोगोटी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना गडचिरोली येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. लालसू नोगोटी हे मंगळवारी सकाळी (१ ऑक्टोबर) रोजी हलवेर येथील आपल्या बहिणीकडून भामरागडकडे येत असताना कारमपल्ली येथे एका वळणावर पहाटेच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. अपघात नक्की कसा झाला याबाबत अद्याप अधिक माहिती मिळू शकलेली नाही. अपघातानंतर नोगोटी यांना तातडीने भामरागड येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.  त्यानंतर पुढील उपचारासाठी नोगोटी यांना नागपूर येथे हलवण्यात आले आहे.

लालसू नोगोटी हे अहेरी विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवणार असल्याची चर्चा आहे. वंचित बहुजन आघाडीच्या पहिल्या यादीत त्यांचं नावही जाहीर झाले होते. मात्र आपण वंचितच्या उमेदवारीवर निवडणुक लढवणार नसून ग्रामसभांनी मला संधी दिली तरच ग्रामसभांकडून अपक्ष निवडणुक लढेन असंही त्यांनी नुकतंच स्पष्ट केलं होतं.

You might also like