औरंगाबाद – शिवाजीनगरात नेहमी होणाऱ्या रेल्वे क्रॉसिंगची कोंडी फोडण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या भुयारी मार्गासाठी 1800 चौरसमीटर जागेचे भूसंपादन केले जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नियुक्त करण्यात आलेल्या रेल्वे, सार्वजनिक बांधकाम व महापालिका अधिकाऱ्यांच्या संयुक्त समितीने बुधवारी शिवाजीनगरात पाहणी केली. भुयारी मार्गाचा नकाशा व आराखडा तयार करण्यात आला आहे. तो अंतिम करण्यासाठी ही पाहणी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
शिवाजीनगर येथील रेल्वे क्रॉसिंगचा विषय अनेक वर्षांपासून गाजत आहे. याठिकाणी भुयारी मार्ग किंवा उड्डाणपूल करून वाहतुकीची कोंडी सोडवावी, या मागणीसाठी वारंवार आंदोलने करण्यात आली. मात्र उपयोग झाला नाही. दरम्यान याप्रकरणी अॅड. शिवराज कडू पाटील व अॅड. रूपेश जैस्वाल यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद येथील खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वे, सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाकडून भुयारी मार्गासाठी लागणारा निधी मंजूर करण्यात आला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने भुयारी मार्गाचा आराखडा तयार केला आहे. महापालिकेने 24 मीटर रस्त्यासाठी भूसंपादन करण्याची प्रक्रिया राबविण्याची तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, बुधवारी महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपअभियंता संजय चामले, सार्वजनिक बांधकाम विभागातील जागतिक बँक प्रकल्पाचे उपअभियंता एस. एन. सूर्यवंशी व रेल्वेच्या चार अभियंत्यांनी स्थळपाहणी केली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने भुयारी मार्गाचा नकाशा सादर केला. रेल्वेच्या अभियंत्यांनी नकाशावर चर्चा केली. यासंदर्भात चामले यांनी सांगितले की, भुयारी मार्गासाठी 24 मीटरचा रस्ता असणे गरजेचे आहे. महापालिकेकडून रस्त्यासाठी भूसंपादन केले जाईल. शिवाजी चौक ते रेल्वेगेटपर्यंत भूसंपादनाची आवश्यकता नाही. रेल्वेगेट ते बीड बायपास रोडपर्यंत 1800 चौरसमीटर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे.