व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

गोंदवले बुद्रुक येथे उद्योगासाठी 36 वर्षापूर्वी दान दिलेल्या जमिनी शेतकऱ्यांना परत

दहिवडी प्रतिनिधी | आकाश दडस

गोंदवले बुद्रुक ( ता. माण ) येथील लोकर प्रक्रिया उद्योगासाठी 36 वर्षापूर्वी दान केलेल्या जमिनी तब्बल 8 वर्षाच्या अविरत लढयानंतर शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क माफीसह परत देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांचा सत्कार शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आला.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, माजी खासदार कै. प्रतापराव भोसले यांनी सातारा लोकर प्रक्रिया सहकारी संस्था मर्यादित सातारा या नावाने कृषी संस्था 31 डिसेंबर 1985 ला स्थापन केली होती. या प्रकल्पासाठी गोंदवले बुद्रुक येथील 12 शेतकऱ्यांनी 15 हेक्टर जमीन कोणताही मोबदला न घेता संस्थेकडे हस्तांतरित केली होती. त्यातील 1. 96 आर जमीन बिगरशेती करण्यात आली होती. संस्था स्थापन झाल्यापासून 15 जुलै 2015 पर्यंत संस्थेचे कामकाज सुरू होऊ शकले नव्हते. त्यामुळे खातेदारांपैकी अरुण कट्टे हे डॉ. येळगावकर यांना घेऊन खासदारांना भेटले. तेव्हा त्यांनी मूळ मालकांना जमिनी परत देण्याची भूमिका घेतली. यानंतर सातत्याने पाठपुरावा करून तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, सहकारमंत्री सुभाषराव देशमुख यांच्यासह अधिकाऱ्यांना भेटून शेतकऱ्यांना जमिनी परत देण्याचा निर्णय 16 मे 2018 रोजी मिळविला. तर शेतकऱ्यांना बक्षीस पत्र उलटून देण्यासाठी भरावे लागणारे 6 लाख 66 हजार 474 रूपये मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क माफ करण्याचा निर्णय विद्यमान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी 15 सप्टेंबर 2021 रोजी केला.

यामध्ये मोलाची भूमिका बजावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल गोंदवले बुद्रुकचे शेतकरी व ग्रामस्थांनी खटावचे माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर यांच्यासह साताऱ्यांचे माजी नगराध्यक्ष विलास आंबेकर व अरूण कट्टे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोंदवले बुद्रुकचे सरपंच जयप्रकाश कट्टे-पाटील, उपसरपंच संजय माने, अंगराज कट्टे, नारायण नवले, तानाजी नवले, अशोक नवले, धनाजी नवले, विशाल नवले, चंद्रकांत कट्टे, सुर्यकांत कट्टे, संदिप महाडिक आदि सह ग्रामस्थ उपस्थित होते.