हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| महाराष्ट्रतील तेल (Oil) खजिण्याबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मालवण (Malvan) आणि पालघरच्या(Palghar) सागरी हद्दीत मोठ्या प्रमाणात खनिज तेलाचे साठे सापडले आहेत. याठिकाणी केलेल्या संशोधनानुसार, मालवणजवळ सुमारे १९,१३१.७२ चौरस किलोमीटर क्षेत्रफळावर तर पालघर जिल्ह्यातील डहाणूच्या समुद्रात ५,३३८ चौरस किलोमीटर क्षेत्रावर हे साठे असल्याचे निष्पन्न झाले आहे. या नव्या शोधामुळे भारताच्या तेल उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारकडून उत्खननास गती
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या आठ वर्षांपासून अरबी समुद्रात तेलसाठ्यांचा शोध सुरू होता. या मोहिमेअंतर्गत १८,००० चौरस किलोमीटरहून अधिक क्षेत्रात संशोधन करण्यात आले आहे. त्यातून महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत मोठ्या प्रमाणात तेलसाठे असल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने याबाबत तत्काळ हालचाली सुरू केल्या आहेत. कारण आता, केंद्र सरकारच्या (Central Government) तेल उत्पादन कंपन्या या भागात उत्खननासाठी प्रयत्नशील होणार आहेत.
दरम्यान, भारतात सागरी तेलसाठ्यांचा शोध घेण्याचे काम गेल्या अनेक दशकांपासून सुरू आहे. १९७४ मध्ये मुंबईपासून ७५ सागरी मैल अंतरावर ‘मुंबई हाय’ येथे खनिज तेलाचा मोठा साठा आढळला होता. तो आजही भारतातील सर्वात मोठा सागरी तेलसाठा मानला जातो. मात्र, आता मालवण आणि पालघरजवळ सापडलेल्या साठ्यांमुळे महाराष्ट्राच्या तेल उत्पादनात मोठी भर पडणार आहे.
महत्वाचे म्हणजे, उथळ समुद्रात सापडलेले हे साठे किनाऱ्यापासून ८६ सागरी मैल अंतरावर आहेत. त्यामुळे त्यांचे उत्खनन तुलनेने सोपे होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारने यासाठी प्रगत तंत्रज्ञान वापरण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे आता मालवण आणि पालघरजवळ सापडलेल्या या तेलसाठ्यांमुळे महाराष्ट्राचा तेल क्षेत्रातील आलेख वाढणार आहे.




