कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील शेवाळेवाडी (म्हासोली) येथील रयत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर लोकनेते स्व. विलासरावजी पाटील (काका )यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन काकांच्या बरोबर काम करणाऱ्या जेष्ठ कार्यकर्त्यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी “सातारा जिल्ह्याच्या सहकार व समाजकारणात विलासकाकांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जोपासण्यासाठी सर्वांनी उदयसिंहाना साथ करावी,” असे आवाहन जेष्ठ नेते, सातारा जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष दादासाहेब गोडसे यांनी केले.
अॅड. उदयसिह पाटील म्हणाले, रयत कारखाना एकवेळ लिलाव होऊन विक्री होतेय की काय अशा अवस्थेत होता. काकांच्या निर्णयामुळे अथणी कारखान्याची करार करून कारखानदारी वाचवण्यात यश आले. आज रयत कर्जमुक्त होऊन सभासद व शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेत आहे. येणाऱ्या काळात आपण गाळप क्षमता विस्तारवाढी बरोबर सह- वीज प्रकल्प उभारत आहोत. आज आपल्यात काका नसले तरी त्यांचे विचार घेऊन कार्यकर्त्यांचा साथी ने वाटचाल करीत आहोत. काकांचे विचार मोडण्याचे षड्यंत्र विरोधकांचे सुरू आहे. त्यास आपलेच काही हिंतचितक खतपाणी घालत आहेत, अशा प्रवृत्तीना काकांच्या कार्यकर्त्यांनी वेळो वेळी धडा शिकवला आहे आणि यापुढेही कार्यकर्त्याच्या साथी ने निश्चित धडा शिकवू.
कार्यक्रमास कारखान्याचे व्हा. चेअरमन आप्पासाहेब गरुड, अथणी रयतचे युनिट हेड रवींद्र देशमुख, कराड पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, अॅड. विजय पाटील, कराड शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कराड तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन रंगराव थोरात, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, रफिक शेठ बागवान, पै. शिवाजीराव जाधव, पै. जगन्नाथराव मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.