पुणे, प्रतिनिधी, मयुर डुमणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांच्यासंबंधी आठवणींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली सभेत विविध मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले. तसेच विद्याताईंविषयींच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आणि पुढे काय या विषयावर चर्चा झाली. या सभेला विद्याताईंचा मित्र परिवार तसेच सामाजिक चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पुण्यातील एस.एम. जोशी सोशालिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात ही सभा पार पडली.
विद्या बाळ यांच्या नावाने अध्यासन असावे
विद्याताईंच्या सहकारी आणि विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील विद्याताईंविषयी आठवणी सांगितल्या. मनाचा साधेपणा ही विद्याताईंची शक्ती होती. त्यांनी सर्वसामान्य स्त्रियांचे प्रश्न समोर आणण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न केले, असे मत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले तसेच विद्याताईंच्या नावाने एखाद्या विद्यापीठात अध्यासन असावे हा विचारही नीलम गोऱ्हे यांनी या प्रसंगी मांडला.
महिलांच्या बाजूने असणाऱ्या स्त्रीमुक्तीची चळवळ ही पुरुषांच्या विरोधात नाही तर पुरुषांना सोबत घेऊन पुढे जाणारी आहे हे ठासून मांडाव लागेल, असे मत सामाजिक कार्यकर्ते आणि एस.एम जोशी सोशालिस्ट फाउंडेशनचे सचिव सुभाष वारे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा देशपांडे म्हणाल्या, मिळून साऱ्याजणी मासिकातील एका लेखाविषयी माझे तीव्र मतभेद होते. मी विद्याताईंना पत्र लिहून कठोर शब्दांत याविषयी मत व्यक्त केले. विद्याताईंनी याविषयी कसलीही खंत व्यक्त केली नाही. मीच जेव्हा त्यांना याबाबत विचारले तेव्हा त्या अगदी सहज म्हणाल्या, अग्ग मतभेद हे असणारच म्हणून आपल्याला एकोपा कमी होऊ द्यायचा नाही. आपण मूठभर आहोत.
चळवळीत मतभेद असतील मात्र त्यामुळे चळवळ कमी होऊ द्यायची नाही. विद्याताईंचा मृदुपणा आणि ठामपणा आपण रुजवू या, असे मत सुषमा देशपांडे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी विनिता बाळ, मनीषा गुप्ते, सरिता आव्हाड, सुनीती, बिंदुमाधव खरे, श्यामला ताई, गीताली वि.म इत्यादी मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.