निलंगा ते उदगीर…. लातूरात विधानसभेला कसं चित्र असेल ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपच्या बालेकिल्ल्याला लातूरात काँग्रेसने सुरुंग लावला… सलग दोन टर्मचे खासदार राहिलेल्या सुधाकर श्रुंगारे यांचा करेक्ट कार्यक्रम करत काँग्रेसचे डाॅ. शिवाजी काळगे यांनी कॉंग्रेसचा बालेकिल्ला पक्षाला पुन्हा मिळवून दिला… हा निकाल इथेच थांबणार नाहीये, तर यामुळे विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे… लोकसभेच्या निकालाने अनेक दिग्गजांची पाचर बसली असली तरी अनेक इच्छुकांच्या आशाही पल्लवीत झाल्यात… गटातटाच्या राजकारणात निलंग्यापासून ते उदगीरपर्यंत जिल्ह्यात विधानसभेला कोण वरचढ ठरतंय? लातूराचे २०२४ चे ते ६ संभाव्य आमदार कोण? त्याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा..

यात पहिला विधानसभा मतदारसंघ येतो तो लातूर शहरचा… लातूर विधानसभा मतदारसंघाचे विभाजन शहर व ग्रामीण अशा दोन मतदारसंघात करण्यात आल्यापासूनच लातूर शहर मतदारसंघात अमित देशमुख हेच यांनीच इथं निर्विवाद वर्चस्व केलं. शहर आणि ग्रामीण हे दोन्ही पट्टे विलासराव देशमुखांच्या दोन चिरंजीवांच्या अधिपत्याखाली येतात. या ठिकाणी वर्षांनूवर्षे काँग्रेसचं वर्चस्व असल्याने खासदारकीसाठीही इथलं मतदान काँग्रेस उमेदवाराच्या बाजूने निर्णायक ठरलं… विलासरावांचे बंधू दिलीपराव देशमुख हेच काँग्रेसचे या मतदारसंघातील पडद्यामागील सूत्रधार असतात… लातूरमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या जागा निवडून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहतो.. लातूर शहरातून अमित देशमुख यांच्या विरोधात इथं पारंपारिकत विरोधक असतात ते भाजपचे शैलेंद्र लाहोटी…मागील दोन विधानसभा निवडणुकीत शैलेंद्र लाहोटी यांचा अमित देशमुख यांनी मोठ्या फरकाने पराभव केलाय…. जातीय समीकरणे आणि विलासराव देशमुख यांचा वारसा अमित देशमुख यांची यंत्रणा ही काँग्रेसची जमेची बाजू राहीलीय… यंदाही लोकसभेतील विजय आणि भाजप विरोधी वातावरणामुळे अमित देशमुखांना नो चॅलेंज असंच मतदारसंघातील वातावरण आहे. लातूर शहरात भाजपला चेहरा नसल्यानं इथून कोण उमेदवार असेल, यावर इथली फाईट ठरणार आहे.. पण भाजपकडून माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर यांचे सुपुत्र अजित पाटील कव्हेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.. पण अमित पाटील २०२४ लाही प्लसमध्ये आहेत एवढं मात्र नक्की…

YouTube video player

लातूर मधील दुसरा विधानसभा मतदारसंघ येतो तो लातूर ग्रामीणचा… लातूर ग्रामीण विधानसभामध्ये अमित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख हे आमदार असून मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या सचिन देशमुख हे रिंगणात होते. पण त्यांना अवघी पाच हजार मतं पदरात पाडून घेता आले.. विशेष म्हणजे ग्रामीणमध्ये नोटाला दोन क्रमांकाची मतं असल्यानं यंदाही धीरज देशमुख मतदारसंघात स्ट्राँग पोजिशनमध्ये दिसतायत… यावेळेस भाजपचे जिल्हाध्यक्ष रमेश कराड यांनी विधासभेची तयारी केलीय… यंदा महायुतीकडून रमेश कराड जर उमेदवार असतील तर धीरज देशमुख यांच्यासाठी कडवं आव्हान उभं राहू शकतं… जातीय समीकरण, राजकीय ताकद आणि स्थानिक नेत्यांच्या सहकार्याच्या जिवावर कराड यांची मदार आहे त्यामुळे येणाऱ्या विधानसभेला लातूर ग्रामीणची लढत रंगतदार होऊ शकते…

आता पाहूयात निलंगा विधानसभा मतदारसंघ…. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर तब्बल ८ वेळा निलंगा मतदार संघातून आमदार राहिले…. मात्र कौटुंबिक वादामुळे त्यांचे नातू संभाजी पाटील निलंगेकर यांनी 2004 असली भाजपमध्ये प्रवेश केला. शिवाजीराव यांनी आपला राजकीय वारसदार अशोक पाटील निलंगेकर यांना घोषित केल्यानं या वादाला तोंड फुटलं होतं… याच निवडणुकीत संभाजी यांनी आपल्या आजोबांचा म्हणजेच शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव यांचा धक्कादायक पराभव केला… पुढे २००९ च्या निवडणूकीत शिवाजीराव पाटील निलंगेकरांनी नातवाचा पराभव करत पुन्हा आमदारकी मिळवली. त्यानंतर मात्र पुढील दोन्ही निवडणुकीत संभाजी पाटील निलंगेकरच निवडून आले. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये त्यांना कामगार व मदत, पुनर्वसन मंत्रिपद मिळालं. आता 2024 च्या विधानसभेत संभाजी पाटील यांना काका अशोक पाटील निलंगेकर याचं आव्हान असेल… त्याचबरोबर काँग्रेसचे युवा नेते असलेले अभय दादा सोळुंके हे सुद्धा काँग्रेसकडून निवडणूकीसाठी इच्छुक आहेत, पण निलंग्यात यावेळी विद्यमान आमदारांच्या विरोधात निकाल जाईल, असा एकूणच ट्रेंड पाहायला मिळतोय…

आता चौथा विधानसभा मतदारसंघ म्हणजे औसा …. जिल्हा जरी लातूर असला तरी लोकसभा निवडणुकीत औसा विधानसभा हा धाराशिव लोकसभा मतदारसंघाला जोडला गेलाय… यंदाच्या लोकसभेला औसानं तब्बल 30 हजार मतांचं लीड मशालीच्या निंबाळकरांना दिल्याने भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांची आमदारकी धोक्यात आलीय… अभिमन्यू पवार यांचे पारंपरिक विरोधक असलेले काँग्रसचे माजी आमदार बसवराज पाटील हेच आता भाजपमध्ये आल्यामुळे अभिमन्यू पवार यांना विरोधक राहिला नाहीये हे स्पष्ट आहे… त्यामुळे ठाकरे गटाकडून माजी आमदार दिनकरराव माने हे यंदा विधानसभेच्या मैदानात दिसतील…. दिलीपराव देशमुख हे दिनकर मानेंसाठी मोठी फिल्डिंग लावतील यात काही शंका नाही. माने विरुद्ध पवार अशी अटीतटीची लढत औसाला यामुळे बघायला लागू शकते… विधानसभेच्या निकालानं आघाडीचं पारड जड झाल्यानं आणि मशालीला मिळालेलं लीड पाहता इथून दिनकरराव माने यांच्या विजयाचे चान्सेस जास्त आहेत…

पाचवा मतदारसंघ येतो तो अहमदपूर – चाकूर विधानसभेचा…. अहमदपूर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बाबासाहेब पाटील हे विद्यमान आमदार आहेत. सध्या ते अजित पवार गटात असले तरी लोकसभेसाठी ते महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी राहिलेत, असं किमान आकडेवारी तरी सांगत नाहीये… बाबासाहेब पाटील यांचा वैयक्तिक जनसंपर्क मोठा आहे. साखर कारखाना, शिक्षणसंस्थांच्या माध्यमातून त्यांनी या भागातील स्ट्रॉंग पोलिटिकल नेटवर्क तयार केलंय… अहमदपूरमधून भाजपच्या विनायक जाधव पाटलांनी नुकतीच राष्ट्रवादीची तुतारी हाती घेतल्यामुळे अहमदपूर चाकूर मध्ये इंटरेस्टिंग लढत बघायला मिळेल… अहमदपूरात तिसरं नाव येते ते दिलीपराव देशमुख यांचं… २०१९ ला अहमदपूर विधानसभा अपक्ष म्हणून लढवलेल्या देशमुख यांच्या मत विभाजनामुळे भाजप उमेदवार विनायक जाधव यांचा पराभव झाला होता… सध्या दिलीपराव देशमुख हे लातूर लोकसभेसाठीही भाजपचे समन्वयक म्हणून काम पाहत होते… थोडक्यात महायुतीमध्ये अहमदपूरच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार आणि भाजपमध्ये तिकिटासाठी कुस्ती होण्याची दाट शक्यता आहे…

आता पाहुयात पालकमंत्री प्रतिनीधीत्व करणाऱ्या उदगीर विधानसभा मतदारसंघाबद्दल… याठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संजय बनसोडे आमदार आहेत. आमदारकीच्या पहिल्याच टर्ममध्ये त्यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये कॅबिनेट, तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये राज्यमंत्रीपदाची लॉटरी लागली… आता युती सरकारमध्ये जिल्ह्याचं पालकमंत्रीपदही तेच सांभाळतायत . राष्ट्रवादी पक्षाचा दलित चेहरा म्हणून लातूरमधून बनसोडे उदयास आले आहेत. येणाऱ्या विधानसभेला आता त्यांना उमेदवारी निश्चित आहेच पण संजय बनसोडे यांनी भाजपच्या सुधाकर शृंगारे यांना उदगीर मधून लीड दिली होती … ही लीड विधानसभेलाही कायम राहिली तर संजय बनसोडेंचा विधानसभेचा मार्ग मोकळा असेल, एवढं jमात्र नक्की… एकूणच काय तर लोकसभेतील विजयामुळे काँग्रेसला जिल्ह्यात पुन्हा नवसंजीवनी मिळाली आहे… त्यामुळे देशमुख कुटुंब आणि इतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ताकद लावली तर विधानसभेला महायुतीच्या आमदारांना मोठा फटका बसू शकतो, असं सद्यस्थितीत बोलायला काहीच हरकत नाही…लातूरच्या सहा मतदारसंघांमध्ये 2024 ला आमदार म्हणून कोणते सहा चेहरे निवडून येतील? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा….