कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील शेतकरी, नागरिकांमध्ये पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत तृणधान्यांचे आहारातील महत्व वाढावे. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त तृणधान्यांचे उत्पादन घ्यावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. शासनाने सुरु केलेल्या या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा’, असे आवाहन राज्याचे सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
कराड येथील प्रशासकीय कार्यालय परिसरात शनिवारी पौष्टीक तृणधान्य विकास कार्यक्रम २०२०-२१ अंतर्गत तृणधान्यांचे आहारातील महत्व विशद करणाऱ्या जनजागृती फेरीचा शुभारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान त्यांच्या हस्ते जनजागृती रथाला हिरवा झेंडा दाखविण्यात आला. त्यानंतर जनजागृती फेरीचा रथ कराड तालुक्यातील ग्रामीण भागात रवाना झाला.
कराड येथील कार्यक्रमास कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख, तालुका कृषी अधिकारी मुल्ला तसेच कृषी विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांच्या हस्ते पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
दरम्यान, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण यांनी कराड तालुक्यात लागवड केलेल्या तृणधान्याबाबत उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमास शेतकरी, कृषी विभागातील अनेक अधिकाऱ्यांनी उपस्थिती लावली होती.
सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा