निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी करण्याचा रोग अविनाश मोहितेंना जडलाय का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

निवडणुकीच्या तोंडावर निव्वळ स्टंटबाजी करण्याचा रोग अविनाश मोहिते यांना जडलाय का? असा प्रश्न कृष्णाकाठी आता सगळ्यांनाच पडू लागला आहे. खरंतर यंदाची वार्षिक सर्वसाधारण सभा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यामध्ये विद्यमान संचालक मंडळाचे बहुतांश सदस्य उपस्थित होते. मुख्य म्हणजे विरोधी गटाचे अविनाश मोहिते व त्यांचे सहकारीही उपस्थित होते. गेल्या ५ वर्षांहून अधिक काळ अविनाश मोहिते कारखान्याच्या संचालक मंडळात कार्यरत आहेत. या काळात संचालक मंडळाच्या सभेत सभासदांच्या प्रश्नांवर एकदाही तोंड न उघडणारे अविनाश मोहिते, वार्षिक सभेत प्रत्यक्ष उपस्थित असतानाही मूग गिळून गप्प बसले होते. सभेत गोंधळ करण्याची संधी न मिळाल्यानेच त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन, निवडणुकीच्या तोंडावर निव्वळ स्टंटबाजी केली आहे. मुळात त्यांनी कारखान्याचा अहवाल नीट वाचला असता तर त्यांना प्रश्नच पडले नसते, अशी बोचरी टीका कृष्णा कारखान्याचे व्हाईस चेअरमन जगदीश जगताप यांनी अविनाश मोहिते यांच्यावर केली.

वार्षिक सर्वसाधारण सभेच्या दुसऱ्याच दिवशी अविनाश मोहिते यांनी पत्रकार परिषद घेऊन उपस्थित केलेल्या प्रश्नांना मुद्देसूद उत्तरे देताना जगदीश जगताप म्हणाले, की कारखान्याच्या सन २०१९-२० या आर्थिक वर्षातील अहवालाबाबत काही प्रश्न असल्यास ते २३ मार्चपर्यंत सभासदांकडून मागविण्यात आले होते. त्यानुसार अविनाश मोहिते यांच्यासह अन्य सभासदांचे लेखी प्रश्न आले होते. या प्रश्नांपैकी सभेशी निगडीत असलेल्या प्रत्येक प्रश्नांबाबत चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

कृष्णा कारखान्याच्या डिस्टलरीच्या नफ्याबाबत प्रश्न विचारताना अविनाश मोहिते यांनी तो अहवालात कुठल्या पानावर नमूद आहे, असा सवाल केला आहे. यावरून त्यांनी अहवाल वाचलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कृष्णा कारखान्याच्या डिस्टलरीला ३० कोटी ७५ लाख ११ हजार ३२२ रुपयांचा नफा झाल्याचे अहवालाच्या पान ६१ वर स्पष्टपणे नमूद असतानाही, ते वाचण्याचे कष्ट अविनाश मोहिते घेणार आहेत की नाही?

कृष्णा कारखान्याने गेल्या ५ वर्षात कधीही एफआरपी थकविलेली नाही, उलट सर्वाधिक एफआरपी दिली आहे. यंदाचा हंगाम अजूनही सुरू आहे. तेव्हा यंदाचा हंगाम संपल्यानंतर आसपासच्या अन्य कारखान्यांशी सल्लामसलत करून शिल्लक एफआरपी अदा केली जाणार आहे.

आधुनिकीकरणामुळे कारखान्याचा मोठा फायदा झाला असून, गाळप व उताऱ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे. अविनाश मोहिते यांनी अहवालातील आकडेवारी नीट अभ्यासली तर त्यांच्या लक्षात येईल, की त्यांच्या ५ वर्षाच्या कार्यकाळात प्रतिदिन सरासरी ६६०० मे. टन गाळप होत होते, जे आधुनिकीकरणामुळे आता प्रतिदिन सरासरी ७६०० मे. टन गाळप होत आहे. म्हणजेच दररोज जवळपास १००० मे. टनाने गाळप वाढले आहे. शिवाय उताराही वाढला आहे.

ज्या कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टने गेल्या ३५ वर्षात हजारो रूग्णांचे प्राण वाचविले, त्या संस्थेवर राजकीय आकसापोटी अविनाश मोहिते वारंवार टीका करताना दिसतात. वास्तविक ट्रस्टसंबंधीचा त्यांचा प्रश्न कारखान्याच्या कामकाजाशी निगडीत नाही. तरीही त्यांनी आत्ता पत्रकार परिषदेच्या निमित्ताने हा मुद्दा पुन्हा उपस्थित केल्याने, त्यांना मला आवर्जून सांगावेसे वाटते, की जरा स्वत:चा अभ्यास वाढवा.

मुळात देशभरातील वैद्यकीय अभ्यासक्रमांचे प्रवेश डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस मार्फत नीट परीक्षेच्या गुणवत्ता यादीनुसार होतात. केंद्राच्या निर्देशाप्रमाणे प्रवेश होत असताना त्याचा कोटा कारखान्यात ठराव करून निश्चित करा, असे म्हणणेच मुळात हास्यास्पद आहे. अविनाश मोहितेंना देशभरातील प्रवेशाची ही प्रक्रिया मान्य नसेल तर त्यांनी केंद्र सरकारच्या पातळीवर पाठपुरावा करायला हरकत नाही.

विरोधक समोर असल्यामुळे आम्हाला झोंबण्याचे काही कारण नाही. उलट सभा खेळीमेळीत पार पडल्याने अविनाश मोहितेंना पोटशूळ उठला आहे.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment