साताऱ्यात एलसीबीचा दणका : गुटखा विकणाऱ्यासह 5 लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुटख्याची राजरोसपणे खरेदी-विक्री होत आहे. याबाबत काही ठिकाणी जुजबी कारवाईचा दंडुकाही उगारला जात आहे. साताऱ्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (एलसीबी) 4 लाख 95 हजार 570 रुपयांचा गुटखा जप्त केला.  गोडोलीतील गणेश बबन यादव (वय 38, रा. गोडोली) यांच्या दुकानावर कारवाई करत त्याला अटक केलेली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, साताऱ्यातील पालवी चौक, गोडोली येथे गुटख्यावर कारवाई करण्यात आली आहे. एलसीबीच्या पथकाला गोडोली परिसरात गुटख्याचा साठा असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी पथक तयार करून घटनास्थळी छापा टाकला. यावेळी विविध गुटख्यांचा साठा असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली असता त्यामध्ये चार ते पाच प्रकारचे पान मसाला, गुटखा होता. पोलिसांनी याबाबतची माहिती अन्न औषध प्रशासनाला दिल्यानंतर त्यांनीही घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केला असता तो गुटखा 5 लाख रुपयांचा असल्याचे समोर आले.

याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे पोलिस हवालदार संजय शिर्के, शरद बेबले, साबीर मुल्ला, प्रविण फडतरे, मुनीर मुल्ला, गणेश कापरे, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, मोहसिन मोमीन, वैभव सावंत यांनी कारवाईत सहभाग घेतला.

Leave a Comment