औरंगाबाद/ नवनीत तापडिया | मागील १७ ते १८ महिन्यांपासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे. मध्यंतरी काही दिवस यामध्ये शिथिलता दिली असली तरी, पुन्हा रुग्ण वाढत असल्याने निर्बंध घालून देण्यात आले होते. यादरम्यान महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस देखील बस स्थानकात उभ्या होत्या. परंतु आता हळूहळू निर्बंध कमी झाल्यानंतर एसटीची चाके फिरत आहेत. परंतु ग्रामीण भागातील एसटीची वाहतूक अद्यापही पूर्णपणे सुरु झाली नसल्याने, ते किलोमीटर भरून काढण्यासाठी एसटीच्या वतीने काही ठराविक मार्गावर अतिरिक्त फेऱ्या करण्यात येत आहेत. यामुळे बहुतांश एसटी बसेसमध्ये केवळ चालक आणि वाहकच प्रवास करताना दिसून येत असतात. त्यातच एसटीचे वरिष्ठ अधिकारी उत्पन्न मिळाले नाही तर चालक आणि वाहक यांनाच जबाबदार धरत आहेत. त्यामुळे बस स्थानक परिसरात बहुतांश चालक वाहक ओरडून ओरडून प्रवासी जमा करतात. परंतु एका चालकाने प्रवासी मिळावे म्हणून एसटी बस चक्क बस स्थानकासमोरील रिक्षा पार्किंग च्या जागेवर उभी करून आपल्या बसमध्ये प्रवासी भरून घेतले. हे चित्र पाहिल्यावर प्रवाशांमध्ये अनेक चर्चाना उधाण आले होते.
याविषयी अधिक माहिती अशी कि, औरंगाबादच्या मध्यवर्ती बस स्थानकातून पुण्याला बहुतांश बसेस जातात. यामुळे प्रत्येक बसला प्रवासी मिळणे शक्य नसते. त्यामुळे शनिवारी सकाळी ८ ते ९ वाजेदरम्यान पुण्यातील शिवाजीनगर आगाराची शिवशाही बस चालकाने आधी बस स्थानकाच्या एन्ट्री पॉईंट वर उभी केली. त्याठिकाणी काही प्रवासी घेतल्यानंतर त्या चालकाने आपली बस चक्क बस स्थानकासमोर असलेल्या रिक्षा पार्किंगच्या जागेवर उभी केली. तिथे वाहक आणि चालक खासगी एजंटप्रमाणे चला नगर पुणे असे ओरडून आपल्या बसमध्ये प्रवासी भारत होते. हा सर्व प्रकार बघून प्रवाशांमध्ये अनेक चर्चाना उधाण आले होते.
हा सर्व प्रकार आमच्या निर्दशनास येताच आम्ही औरंगाबाद मध्यवर्ती बस स्थानकाच्या आगार प्रमुखांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ती बस बाहेरील आगाराची होती. आमच्या आगाराच्या सर्व बसेस शिस्तीमध्ये बस स्थानकातच उभ्या राहतात. ज्या आगाराची ती बस असेल त्या आगारच्या आगार प्रमुखांच्या कानावर ही गोष्ट टाकेन असेही त्यांनी सांगितले. तसेच आम्ही बस स्थानकातील बसेसचे एन्ट्री रजिस्टरमध्ये बघितले असता त्यात संबंधित बसची एन्ट्री नसल्याचे आढळून आले.