Tuesday, March 21, 2023

‘लेडी सेहवाग’ शेफालीचा महिला टी-२० वर्ल्डकपमध्ये धुमाकूळ

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महिलांना लांब षटकार मारता येणार नाहीत असं म्हटलं जात होतं. त्यांच्यासाठीची बाऊंड्री लाईनसुद्धा जवळ करावी अशा सूचना अनेकदा करण्यात आल्या. आता मात्र या सूचना येणार नाहीत. कारण हरयाणामधील रोहतकच्या शेफाली वर्माने टीम इंडियात धडाक्यात प्रवेश केला आहे. केवळ प्रवेश करुन ती थांबली नाहीये, तर संघाला पुढे नेण्यातही तिचा महत्वाचा वाटा राहिला आहे.

भारतीय महिला क्रिकेट हे अंजुम चोप्रा, मिताली राज, झुलन गोस्वामी या तीन नावांभोवती दीर्घकाळ फिरत राहिलं होतं. मागील 2 वर्षांत स्मृती मानधना, हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिगझ, वेदा कृष्णमूर्ती यांच्याभोवती ते फिरलं. आता मात्र शेफालीने ते लक्ष स्वतःकडे वळवून घेतलं आहे.

- Advertisement -

सुरुवातीला येऊन तुफान फटकेबाजी करणं शेफालीला चांगलं जमतं. यामुळेच तिला लेडी सेहवाग असंही म्हटलं जातंय. यंदाच्या महिला टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यातील शेफालीचा खेळ डोळ्याचं पारणं फेडणारा होता. संघातील सिनियर खेळाडूंनासुद्धा शेफाली आपल्यापेक्षा अनुभवी आहे असंच वाटतंय. एकूण काय महिला क्रिकेटला अच्छे दिन आलेले असताना गोलंदाजांना धडकी भरवणारी शेफाली भारताकडून खेळत असल्याने दुधात साखर असाच योग जुळून आला आहे. शेफालीच्या हीच खेळी पुढे सुरु राहिली तर पहिला विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही साकार होईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.