सातारा शहरातील “या” भागात शिरला बिबट्या, वन विभागाची शोध मोहिम सुरू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सातारा जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरात बिबट्या असल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर सोमवारी दि. 30 रोजी रात्री वन विभागाच्‍या पथकाने शोध मोहिम राबविली आहे. रात्री जिल्हाधिकारी कार्यालयासह शेजारील संपूर्ण परिसर पिंजून काढत त्‍याचा शोध घेण्‍याचा प्रयत्‍न केला. मात्र अंधार, पावसामुळे वन विभागाने राबविलेल्‍या शोध मोहिमेत अडचणी येत होत्‍या. रात्री दहापर्यंत विविध ठिकाणी शोध घेतल्‍यानंतरही बिबट्याचा मागमूस लागू शकला नव्‍हता. या ठिकाणाहून बिबट्याचा माग काढण्‍यासाठी सातारा पोलिस दलाचे श्‍‍वानपथक मागविण्‍यात आले होते. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या सुरक्षा रक्षकास कार्यालयाच्या मुख्‍य दरवाजाजवळील झाडाझुडपात हालचाली जाणवल्‍या. त्यामुळे त्‍याने बॅटरीच्‍या प्रकाशात शोध घेतला असता त्‍याला झुडपात बिबट्या असल्‍याचे जाणवले. यामुळे त्‍याने याची माहिती वरिष्‍ठांना दिली.

सदरची माहिती मिळाताच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी त्‍याठिकाणी दाखल झाले. त्‍यांनी माहिती घेत बिबट्याचा माग काढण्‍याचे काम सुरू केले. अंधार, पावसामुळे या कामात अडथळा येत होता. जिल्‍हाधिकारी कार्यालयाच्‍या परिसरात बिबट्या असल्‍याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्‍याने सर्वत्र घबराट पसरली. वन विभागाच्‍या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण परिसर पिंजून काढत नागरिकांना योग्‍य ती खबरदारीच्‍या, तसेच बिबट्या दिसल्‍यास त्‍याची माहिती देण्‍याचे आवाहन केले.

अजिंक्‍यतारा किल्‍ल्‍याच्‍या पिछाडीस असणाऱ्या सुळाचा ओढा परिसरातून बिबट्या नागरी वस्‍तीत घुसला असण्‍याचा अंदाज वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी वर्तवत आहेत. रात्री थांबविलेली शोध मोहीम पहाटेच्‍या सुमारास पुन्‍हा सुरू करण्‍यात आली असल्‍याची माहिती वन अधिकारी निवृत्ती चव्‍हाण यांनी दिली.

Leave a Comment