सातारा | शहरापासून अवघ्या २२ की.मी. अंतरावर असलेल्या निनाम गावात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला आहे. गावालगतच्या ऊसाच्या शेतात बिबट्याने तळ ठोकला असून गावकर्यांमधे त्याची एकच दहशत पसरली आहे. निनाम-कुसवडे रस्त्यावर लेंडा नावाच्या शिवारात बिबट्याचा वावर असल्याचे गावकरी सांगत आहेत.
आत्ता पर्यंत बिबट्याने गावातील ४ कुत्री आणि दोन शेळ्या फस्त केल्या आहेत. सध्या शेतीचे काम चालू असल्यामुळे गावकर्यांना कामात अडथळा येत आहे. चार दोघांना बिबट्या दिसल्याने गावकर्यांनी त्यांचा चांगलाच धसका घेतला आहे.
यासंबधी गावकर्यांनी वनविभागाकडे तक्रार केली असून गाव परिसरात वनविभागाकडून दोन वनरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. वनविभाग बिबट्याला पकडण्यासाठी साफळा रचण्याच्या तयारीत आहे.