कराड | कृष्णा कारखाना हा महाराष्ट्रातील सर्वांत जुना कारखाना आहे. सहकार क्षेत्राला दिशा देण्याची क्षमता कृष्णा कारखान्यामध्ये असून, महाराष्ट्रात हा कारखाना पथदर्शी ठरावा यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा कारखान्याच्या 62 व्या गळीत हंगाम शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. चेअरमन डॉ. सुरेश भोसले व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. उत्तरा भोसले यांच्या हस्ते आणि कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत मोळी टाकून 62 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमाला व्हाईस चेअरमन जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, गुणवंतराव पाटील, निवासराव पाटील, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, सयाजी यादव, दत्तात्रय देसाई, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी साखर उद्योगाच्या सद्यस्थितीचा आढावा घेत, विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले, साखरेचा दर स्थिर नसल्याने साखर उद्योग अडचणीत आहे. जगात ब्राझील हा देश सर्वांत मोठा साखर उत्पादक देश असून, यंदा तिथे दुष्काळ पडल्याने साखरेचे उत्पादन प्रचंड घटले आहे. अशावेळी भारतातील साखरेला जागतिक बाजारपेठेत मागणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असली, तरी दराबद्दल साशंकता कायम आहे. आत्तापर्यंत कुठल्याही सरकारने इथेनॉलचे दर निश्चित केले नाहीत. मात्र ना. नितीन गडकरी यांनी इथेनॉलचे दर निश्चित करून साखर उद्योगाला स्थिरता मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळेच यंदाच्या हंगामात इथेनॉल निर्मितीला प्राधान्य देण्याचे धोरण आमच्या संचालक मंडळाने घेतले आहे. बी हेव्ही तसेच रसापासून इथेनॉल निर्मिती करण्याबरोबरच साखरेपासून इथेनॉल निर्मिती करणे कितपत शक्य आहे, याबाबतचा प्रयोगही केला जाणार आहे.
शेतीत नवे तंत्रज्ञान आले असून, भविष्यात शेतकरी घरात बसूनच शेती करेल अशी स्थिती यायला वेळ लागणार नाही. भविष्याचा वेध घेऊन शेतकऱ्यांनी या नव्या तंत्रज्ञानाचा शोध घ्यायला हवा. सर्व सभाससदांचा ऊस वेळेत तुटावा, तसेच सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी ऊसाच्या तोडीमध्ये कुणीही राजकारण आणू नये, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, की चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याची वाटचाल जोमाने सुरू आहे. साखर व उपपदार्थ करण्याकडे व उत्पन्नाचे अनेक मार्ग निर्माण करण्याची शिकवण डॉ. सुरेश भोसले यांची असल्याने, कारखान्यास स्थिरता लाभत आहे. कारखान्यात राजकारण विरहित कारभार सुरू असून, सर्व सभासद एक कुटुंब आहे, याच भावनेतून सर्व संचालक काम करतात.
कार्यक्रमाच्या प्रारंभी जगदीश जगताप व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. विद्या जगताप यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. संचालक लिंबाजी पाटील यांनी आभार मानले.