हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | “पत्रलेखन हा संवादाचा उत्तम मार्ग असून माणसं, कुटुंबं सावरण्यासाठी पत्रं लिहिणं गरजेचं असल्याचं मत कवी इंद्रजीत भालेराव यांनी व्यक्त केलं. वर्डालय मिडिया अँड पब्लिकेशन हाऊसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेच्या ऑनलाईन पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रसंस्कृतीच्या इतिहासबाबत बोलत असतानाच मराठीतील साहित्यिक, राजकीय व्यक्तींच्या पत्रलेखनाच्या आठवणींनाही इंद्रजीत भालेराव यांनी उजाळा दिला.
सोशल मीडियाच्या जमान्यात हरवलेली पत्रलेखनाची संस्कृती पुनरुज्जीवित करण्यासाठी ‘वर्डालय’ मीडिया अँण्ड पब्लिकेशन हाऊसने पुढाकार घेतला. लिहित्या हातांना बळ देण्यासाठी, त्यांच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी ‘वर्डालय’तर्फे पत्रलेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रलेखन स्पर्धेचा ऑनलाईन बक्षीस वितरण कार्यक्रम रविवार दि. 29 ऑगस्ट 2021 रोजी पार पडला. महाराष्ट्रासह विविध देशातून 476 हून अधिक पत्रलेखकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सुवर्णा जगताप प्रथम, ऋचा दिनकर द्वितीय तर वीणा डोंगरवार या तृतीय क्रमांकाच्या पारितोषिक विजेत्या ठरल्या. याव्यतिरिक्त इतर विशेष 7 पत्रांचाही यावेळी गौरव करण्यात आला. तसेच वाचकांच्या पसंतीचे पत्र म्हणून महेंद्र पाटील यांची निवड झाली.
https://www.facebook.com/112171461102697/videos/221241919951590/
पत्रलेखन स्पर्धेचे विषय वैविध्यपूर्ण असल्याने महिनाभरापेक्षा कमी कालावधीतच पाचशेहून अधिक पत्रे ‘वर्डालय’कडे जमा झाली. पावसाला, महापुरुषांना, नकार दिलेल्या प्रेयसीला, विठ्ठलाला आणि आवडेल त्या विषयावर पत्र लिहायला या स्पर्धेत संधी होती. निर्धारित वेळेत जमा झालेल्या 476 पत्रांमधून पहिल्यांदा 60 पत्रांची निवड करण्यात आली. त्यातून अंतिम 10 आणि नंतर उत्कृष्ट 3 पत्रलेखकांना या कार्यक्रमात गौरवण्यात आलं. पत्रलेखन स्पर्धेला अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळाल्याने येत्या काळात असे उपक्रम लिहित्या, जाणत्या लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आणखी जोमाने प्रयत्न करणार असल्याचं डॉ. स्वप्निल चौधरी यांनी सांगितलं.
या कार्यक्रमासाठी प्रसिद्ध नेत्ररोगतज्ञ डॉ. संदीप निमसे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते. पोस्ट खात्यात मागील 25 वर्षांहून अधिक काळ काम केलेल्या श्री. जे.ए.इनामदार यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती. या पत्रलेखन स्पर्धेसाठी युवा रंगकर्मी कृतार्थ शेवगावकर आणि ग्रामयुवा संस्थेच्या संस्थापिका हर्षाली घुले यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलं. कार्यक्रमाचं सुत्रांचालन अपूर्व राजपूत यांनी केलं. पत्रलेखन उपक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी ‘वर्डालय’चे प्रमुख डॉ. स्वप्निल चौधरी आणि प्रा. प्रज्वली नाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.