सांगली प्रतिनिधी । प्रतिमेश गोंधळे
पोटच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्या नराधम बापास आज जिल्हा व सत्र न्यायाधीशांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदरची घटना हि तासगाव तालुक्यातल्या येळावी येथे 23 एप्रिल 2019 रोजी घडली होती. मुक्तार जाफर शेख असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डि. एस. हातरोटे यांनी शेख यास दोषी धरून बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच बायकोस मारहाण केली म्हणून सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा देखील सुनावली. फिर्यादी ही तिचा नवरा म्हणजेच आरोपी मुक्तार शेख व पिडीत मुलगी व मुलगा यांच्या सोबत तासगाव तालुक्यातल्या येळावी येथील जलशुध्दीकरण केंद्राचे पाठीमागे राहत होती. 23 एप्रिल 2019 रोजी मुलीची आई व तिचे कुटुंबिय झोपले होते. त्यावेळी आरोपीने स्वतःच्या पिडीत मुलीशी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मुलीच्या आईने आरोपीस प्रतिकार केला असता, तिला शिवीगाळ व मारहाण केली करून पिडीत मुलीवर अत्याचार केले. घडलेल्या या प्रकारानंतर पीडित मुलीच्या आईने तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या प्रकरणी तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक यु. एम. दंडिले यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याकामी सरकार पक्षातर्फे एकुण सहा साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी, पिडीत मुलगी तसेच वैदयकिय अधिकारी यांची साक्ष महत्वपूर्ण ठरली. उपलब्ध साक्षीपुराव्याचे आधारे यातील आरोपी मुक्तार जाफर शेख यास शिक्षा सुनावली.