औरंगाबाद – साहित्य संमेलन हा विकासाचाच एक भाग असतो, त्यामुळे सरकारने साहित्य संमेलनासाठी मदत केलीच पाहिजे असं सांगितलं. तर गेल्या दोन वर्षात आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. तरीही राज्यात मराठी विद्यापीठ निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षण मंत्र्यांनी एक समिती स्थापन केली आहे. त्यासाठी आता चर्चा होईल. मराठी विद्यापीठाच्या निर्मितीसाठी व्यवस्थित आराखडा तयार करायला हवे. असंही मत त्यांनी व्यक्त केलं त्यामुळे आता महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन होण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केलं. आज औरंगाबाद शहरात 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.
या कार्यक्रमात बोलताना चव्हाण म्हणाले, बदलत्या माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाचन संस्कृती वाढवण्यासाठी कसा करता येइल याबाबतही चिंतन होणे गरजेचे आहे. वाचनातून वैचारिक बैठक तयार होवून समाजाला दिशा दर्शक भावी पिढी घडवण्याचं काम साहित्य करित असते. तसेच माणसाचे विचार व्यक्त करण्याची मोकळीक साहित्य लेखनातून मिळते. म्हणूनच साहित्याचा उल्लेख समाजाचे प्रतिबिंब म्हणून केला जातो, असेही अशोक चव्हाण उद्घाटनपर भाषणात म्हणाले.
या कार्यक्रमात मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, आमदार सतिश चव्हाण, मधुकर अण्णा मुळे, के. एस. अतकरे, मावळते संमेलन अध्यक्ष ऋषीकेश कांबळे, साहित्यिक दादा गोरे यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.