मीरारोड : हॅलो महाराष्ट्र – मीरारोड या ठिकाणी एक संतापजनक प्रकार घडला आहे. यामध्ये लहान मुलगा अंगावर थुंकला म्हणून त्याच्या आईला चार महिलांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला गुप्ता गल्लीत गुडीयादेवी सैनी ह्या पती मुकेश व दोन मुलांसह राहतात.
काय आहे नेमका प्रकार
घटनेच्या दिवशी सायंकाळी छाया गुप्ता हिचा नातू विवेक हा सैनी यांच्या घरी गेला. तुमचा मुलगा राज ह्याने आपल्या अंगावर थुंकल्याची तक्रार विवेक याने गुडियादेवी यांच्याकडे केली. त्यावर राज याला बोलावून पकडून मारते असे गुडियादेवी यांनी विवेकला सांगितले. यानंतर काही वेळाने छाया सह बन्ना, मीना व मोटीबाई ह्या चौघी जणी गुडियादेवीच्या घरा बाहेर आल्या आणि त्यांना शिव्या देऊन लागल्या. यानंतर शिवीगाळ का करता ? अशी विचारणा केली असता विवेकची आई बन्ना हिने, तुझा मुलगा राज हा माझ्या मुलाच्या अंगावर थुंकला असे म्हणत पुन्हा त्या चौघीनी शिवीगाळ करायला सुरवात केली.
यावेळी गुडियादेवी यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता या चौघींनी गुडियादेवी यांना घराबाहेर खेचून ठोशाबुक्क्यांनी व लाथांनी मारहाण सुरु केली. बन्ना हिने गुडियादेवीचा कान धरून खेचला असता कानातील रिंग ओढली गेल्याने कानाची पाळी फाटून त्यातून रक्त आले. यानंतर गुडियादेवी या चौघींच्या ताब्यातून आपली सुटका करून भाईंदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी उपचारासाठी चिठ्ठी दिल्यावर त्या आधी भाईंदरच्या भीमसेन जोशी रुग्णालयात गेल्या. तेथून त्यांना कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठवण्यात आले. यादरम्यान पोलिसांनी छाया, बन्ना, मीना व मोटीबाई ह्या चौघींवर गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.