एटापल्ली पं. समितीच्या गैरकारभारा विरुद्ध धो-धो पावसात नागरिकांचे धरणे आंदोलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एटापल्ली येथील पंचायत समिती प्रशासनातील अनागोंदी कारभार, पेट्रोल पंपवरील असुविधा व पेट्रोल, डिजल विक्री नफा रक्कमेतील भ्रष्टाचाराची चौकाशी करण्याच्या मागणी करत भर पावसात माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके, नगरसेवक मनोहर बोरकर, नगरसेवक निजान पेंदाम व नागरिकांनी एक दिवसीय धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी तहसीलदार पी. व्ही. चौधरी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठविले. यावेळी स्थानिक व्यापाऱ्यांनी संपूर्ण बाजारपेठ दिवसभरासाठी बंद ठेऊन आंदोलनास पाठींबा दिला होता.

पंचायत समिती मार्फत नागरिकांना मिळणाऱ्या विविध शासकीय लाभाच्या योजना केवळ कागदावर पूर्ण झाल्याचे दाखवून विकास निधी हडप केल्याचा संशय आंदोलकांच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. ठक्कर बाप्पा वस्ती सुधार योजना, आदिम जमाती कल्याण योजना, दलित वस्ती सुधार योजना, जिल्हा वार्षिक नियोजनाच्या योजना, पंचवीस, पंधरा वित्त आयोग योजना, पाच टक्के अबंध निधी योजना व रोजगार हमी सिंचन विहीर योजनांमधून झालेल्या कामांच्या अंदाजपत्रक, प्रशासकीय मंजुरी, नोटशीट, मंजूर निधी व अदा केलेले बिले अशा दस्ताऐवजाची तपासणीची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तसेच विकास सर्व्हिस स्टेशन या नावाने गेली १८ वर्षापासून चालविले जाणारे पेट्रोलपंपच्या पेट्रोल, डिजल विक्रीतून झालेल्या नफा रक्कमेत घोळ करून भ्रष्टाचार केला गेल्याचा आरोपही आंदोलकांनी मुख्यमंत्री शिंदे यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.

पंचायत समिती प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य संजय चरडुके नगरसेवक मनोहर बोरकर, नगरसेवक निजान पेंदाम, माजी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबुराव गंपावार, व्यापारी संघटना अध्यक्ष महेश पुल्लूरवार, भाकपा तालुका सचिव सचिन मोतकुलवार यांनी केली आहे. तसेच मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांच्या वतीने देण्यात आला आहे.

आंदोलनादरम्यान रविंद्र रामगुंडेवार, लक्ष्मण नरोटे, तुलसीदास गुडमेलवार, श्रीनिवास कंबगौनीवार, उपेश सुरजगाडे, अनिल बुग्गावार, प्रा. विनोद पत्तीवार विशाल ओडपल्लीवार, विशाल बाला, कृष्णा उप्पलवार, प्रफुल आईलवार, शुभम वन्नमवार, भगवान चापले, रुपेश सोनी, दिलीप पुपरेड्डीवार, नरेश गाईन, बाबुराव मंडल, विजय नगराळे अमजतखा पठाण, महानंदा मंडल, रामप्रसाद बिश्वास, विनोद चव्हाण, रामदास नाडमवार, शिवचरण टोप्पो, निलेश गंपावार, मनोज मजुमदार, अजय बिश्वास, अरुण डे, महानंदा मंडल, नरेश गाईन, चेतन दुर्गे, नित्यानंद दास, राजेंद्र सोनूले, भ्रिगु सरकार, संजय बिश्वास यांनी उपस्थिती लावली होती.