सातारा | पुणे-सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही इसम पट्टेरी वाघाची कातडी तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून संबंधित इसमास टोळीला जेरबंद केले. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून त्यांच्याकडून 4 फूट लांबीचे, दीड फूट रुंदीचे एका पट्टेरी वाघाचे कातडे व वरच्या जबड्यात 13 दात व खालच्या जबड्यात 16 दात, एक मोटारसायकल व 4 मोबाईल फोन असे एकूण 5 लाख 26 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि. 1 ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथकास पुणे-सातारा रोडवर सारोळा ब्रीज खाली काही इसम पट्टेरी वाघाची कातडी तस्करी करून विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. गोपनीय माहितीच्या आधारे सारोळा ब्रिज येथे पथकाने सापळा लावून वाघाच्याकातडी विक्रीसाठी आलेल्या 4 इसमाना ताब्यात घेतली. यामध्ये दिनेश अशोक फरांदे (वय 38, रा. ओझर्डे, ता. वाई जि. सातारा), हसन रज्जाक मुल्ला (वय 35, रा. ओझर्डे, ता. वाई), गणपत सदू जुनगरे (वय 45, रा. देवदेव ता.जावळी, जि. सातारा), सुनील दिनकर भिलारे (वय 52′ रा. भिलार ता.महाबळेश्वर) यांना अटक केली.
त्यानंतर संबंधित पथकाने नसरापूर वन विभागचे वन्य जीव रक्षक अधिकारी यांना याची माहिती दिली. आरोपींना पुढील कारवाई कामी राजगड पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या तपासाची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, सहाय्यकी पोलीस निरीक्षक माने, पोलीस नाईक अमोल गोरे, पोलीस हवालदार ज्ञानेश्वर क्षीरसागर, पोवीस नाईक गुरू जाधव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल शेडगे, मंगेश भगत, बाळासाहेब खडके, अक्षय नवले, अक्षय जावळे, पूनम गुंड, चालक प्रमोद नवले यांनी केली आहे.