नवी दिल्ली । लॉकडाउनमुळे देशभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी केंद्र सरकारनं विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याची घोषणा केली होती. आजपासून ही सेवा सुरु होत आहे. यासाठी आयआरसीटीसी या रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरुन ऑनलाइन तिकीट विक्री सुरु करण्यात आली होती. त्यानुसार, सोमवारी ११ मे रोजी केवळ ३ तासांत ५४,००० प्रवाशांपैकी ३०,००० तिकिटं बुक झाली. विशेष म्हणजे या बुकिंगमधून रेल्वेला १० कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान, मुंबई-दिल्ली मार्गावरील १२ ते १७ मे या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यांसाठीची संपूर्ण बुकिंग फुल्ल झालं आहे.
काल सोमवारी संध्याकाळी ४ वाजेपर्यंत हजारो लोक इच्छित स्थळी जाण्यासाठी तिकीट बुकिंगासाठी वेटिंगवर होते. लोकांनी ऑनलाइन बुकिंगसाठी आयआरसीटीसीच्या साईटवर संध्याकाळी ४ वाजता एकच गर्दी केल्यानं ती क्रॅश झाली. त्यामुळे पुन्हा २ तास उशीरानं म्हणजेच संध्याकाळी ६ वाजता बुकिंगला सुरुवात झाली. दरम्यान, बुकिंग सुरु झाल्यानंतर पहिल्या १० मिनिटांत हावडा-नवी दिल्ली रेल्वे गाडीची सर्व तिकीट बुक झाली. ही रेल्वे आज (मंगळवार) संध्याकाळी ५.०५ मिनिटांनी सुटणार आहे. मंगळवारपासून ज्या विशेष वातानुकुलित रेल्वेगाड्या सोडण्यात येणार आहेत, त्या १५ गाड्यांच्या जोड्यांची माहिती रेल्वेने यापूर्वीच जाहीर केली आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळं सर्व प्रवाशी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर ५० दिवसांनंतर आता या विशेष गाड्या सोडण्यात येत आहेत.
इकॉनॉमिक टाइम्सनं रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं वृत्त देताना म्हटलं की, “सोमवारी संध्याकाळी रेल्वेच्या बुकिंगला सुरुवात झाल्यानंतर रात्री ९ वाजेपर्यंत केवळ ३ तासांत ९.९ कोटी रुपयांची तिकीट विक्री झाली. मुंबई-दिल्ली मार्गावरील १२ ते १७ मे या कालावधीत सुटणाऱ्या गाड्यांसाठीची संपूर्ण बुकिंग फुल्ल झालं आहे. तसेच भुवनेश्वर-नवी दिल्ली या गाडीसाठीची तिकिटं ६.३० वाजताच पूर्ण विकली गेली. त्याचबरोबर इतर काही मार्गावर सोडण्यात येणाऱ्या गाड्यांची तिकीट अद्याप उपलब्ध आहेत,” असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. प्रवाशांना ऑनलाइन किंवा मोबाईल अपच्या माध्यमातून आठवडाभर आधी तिकीट बुक करता येणार आहे. तसेच रद्द तिकीटाची बुकिंग होणार नाही. वेटिंग लिस्टच्या प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, असंही रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
”ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”