Lockdown Impact | स्वयंपाकाचे काम करणाऱ्या मैना हजारा करत आहेत नाला सफाईचे काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात सर्वत्र कोरोनामुळे संचारबंदी असल्याने तळहातावर पोट असणाऱ्यांसमोर जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. अनेकांच्या रोजगारावर लॉकडाऊनमुळे गंभीर परिणाम झाला असून त्यांच्या हाताचे काम गेले आहे. शहरी भागात स्वयंपाकाचे काम करणाऱ्या महिलांवर देखील यामुळे मोठी समस्या ओढवली असून कोरोना संसर्गाच्या भीतीने कोणीही कामावर बोलावत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. दिल्ली येथे स्वयंपाकाचे काम करणाऱ्या मैना हजारा यांच्यावर कोरोनामुळे प्रथमच स्वच्छतेचे काम करण्याची वेळ आली आहे.

अनेकांच्या हाताला काम नाही. कुणी काम द्यायला तयार नाही अशा अवस्थेत आपल्या दोन मुलांचा सांभाळ कसा करायचा, घरभाडे कुठून द्यायचे? अशा अनेक समस्यांमुळे स्वयंपाकाचे काम करणाऱ्या मैना हजारा या नाला स्वछतेचे काम करत आहेत. मी एकवेळ उपाशीपोटी झोपू शकते मात्र लहान मुलांना उपाशी? त्यामुळे आता मी हे काम करत आहे असे हजारा यांनी सांगितले आहे. कोरोनाच्या रुग्ण संख्येच्या वाढत्या प्रमाणात नागरिकांनी अधिक सुरक्षित आणि सतर्क राहण्याची गरज आहे. मात्र पोटाचा प्रश्न महत्वाचा हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. चार पैशांसाठी जीवावर उदार होऊन कोणतेही काम करण्यासाठी हे कामगार तयार झाले आहेत.

दरम्यान, गेल्या दोन महिन्यापासून देशात सुरु असणाऱ्या संचारबंदीमुळे सर्वत्र काम बंद आहे. स्थलांतरित कामगार उदरनिर्वाहाचे साधन आणि सुरक्षा काहीच उपलब्ध नसल्याने आपापल्या घरी परतण्यासाठी धडपडत आहेत तर स्थानिक रोजंदारी कामगार कामाशिवाय अस्वस्थ जगत आहेत. सर्वत्र बंद असल्याने छोटे व्यावसायिक, घरकाम करणारे कामगार आणि इतर रोजंदारी कामगार काम नसल्याने पुढे काय करायचे या चिंतेत आहेत. जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार ४० ते ६० दशलक्ष लोक बेरोजगार होण्याची शक्यता आहे. या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थलांतरित कामगारांसहित या लोकांचे प्रश्न ही तितकेच गंभीर आहेत.