भाज्यांपासून बनवलेली – “पौष्टिक lockdown करंजी”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सारं काही पोटासाठी | मेघना देशमुख

घरात शिल्लक असलेल्या भाज्या वापरून लॉकडाऊनच्या कालावधीत शिकलेली आणि केलेली ही नवीन रेसिपी. आता लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु झालाय, घरी बसणं अक्षरशः जीवावर आलंय. पण ही पदार्थ बनवण्याची आवड जिवंत आहे, म्हणूनच असं वेगळं काहीतरी करता येतंय. देशभरात लाखो लोकांची उपासमार होत असताना आपण असं चमचमीत खाणं योग्य आहे का? असा अपराधी भाव माझ्याही मनात येतो बरं का..!! पण आता हीच आवड रोजगाराच्या स्वरूपात बदलता येतेय का याचा प्रयत्न करुन बघायचाय. कसा? ते प्रत्येक नवीन रेसिपीसोबत सांगत राहीनच. तूर्तास पाहुयात करंजीचा हा एक भन्नाट प्रकार. घरी उपलब्ध असणाऱ्या भाज्यांचा वापर करुन हलक्या-फुलक्या नाष्ट्यासाठी बनवता येईल अशी ही करंजी तुम्हाला नक्कीच आवडेल.

साहित्य :-
कणकेसाठी – 2 वाटी गव्हाचे पीठ / मैदा, तेल, मीठ, पाणी

सारणासाठी – 1 छोटा बटाटा बारीक चिरलेला, 1 वाटी फ्लॉवरचे बारीक काप, 1 छोटा बारीक चिरलेला कांदा, 3-4 हिरवी मिरची बारीक चिरलेली, 1/2 वाटी वाटाणा (तुम्हाला बाजारात जर ओले मूग मिळाले तर तेही चालतील), एक चिमूट हिंग, चवीसाठी मीठ, 1/2 चमचा धने पूड, 1/2 चमचा जिरेपूड
(तुमच्याकडे अजून वेगळ्या भाज्या असतील तर वापरू शकता. फक्त त्या वापरताना सारणाला जास्त पाणी सुटू नये याची काळजी घ्या.)

कृती :-
पीठामध्ये चवीपुरते मीठ घालुन घ्या. 4 चमचे कडक तेलाचे मोहन घालुन छान मिसळून घ्या. गरजेपुरते पाणी घालून कणिक घट्ट भिजवा. 20 मिनिटे झाकून ठेवा. आता कढईमध्ये 2 चमचे तेल गरम करुन त्यात कांदा परतून घ्या. त्यानंतर चिरलेल्या सर्व भाज्या आणि मीठ, हिंग, धणेपूड व जिरेपूड घालून सारण व्यवस्थित परता.4-5 मिनिट परतल्यावर सारण थंड करण्यासाठी ठेवा.
सारण थंड होइपर्यंत कणकेचे छोटे-छोटे गोळे करून करंजीसाठी पोळ्या लाटून घ्या. त्यावर सारण घालून करंजी तयार करा. (करंजीचा साचा वापरला तरी चालेल) आता तेल गरम करून करंजी तळून घ्या. टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी सोबत सर्व्ह करा.

मेघना देशमुख या जैवरसायनशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका असून त्यांना पाककलेची विशेष आवड आहे. प्रतिक्रियांसाठी संपर्क – 8698163195

Leave a Comment