लोकसभा निवडणुकीने समाजात पसरला जातीय तेढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now
 सांगली प्रतिनिधी |प्रथमेश गोंधळे,
लोकसभा निवडणुकीचे मतदान शांततेत पार पडले असले तरी या लोकसभा निवडणुकीत प्रथमच जातीचा टोकदार संघर्ष पहायला मिळाला. प्रत्येक गावामध्ये गटातटाचे कार्यकर्ते जातीच्या समूहामध्ये बांधलेले आढळून आले. नेत्यांचे ऐकण्याच्या मन:स्थितीत कुणी नव्हते. एक जात केंंद्रीत होत असताना दुसर्‍या बाजुला बाकीच्या जातीदेखील केंद्रीत होत होत्या. यामुळे जिल्ह्यातील सामाजिक अभिसरणावर गंभीर परिणाम होताना दिसला.
प्रथमच जाती-जातीवर मतदान अत्यंत प्रभावीपणे झाल्यामुळे धर्माबरेाबर हा मुद्दा विधानसभा निवडणुकीतही अग्रेसर राहील, अशी शक्यता आहे.  सोशल मिडियावर अत्यंत आक्षेपार्ह व अश्‍लील भाषेत एकमेकांवर शेरेबाजी होत होती. जिल्हा प्रशासन व जिल्हा पोलीस यंत्रणा याबाबतीत ढिम्म दिसत आहे. आगामी काळात याची क्रिया-प्रतिक्रिया उमटू नये याची दक्षता सर्वांनी घेतली नाही तर नव्या सामाजिक दुहीला प्रारंभ झाल्याशिवाय राहणार नाही.
लोकसभेची असलेली ही निवडणूक जाती-धर्माच्या मुद्द्यावर वळली होती. निवडणुकीत विकासकामांवर चर्चा हवी आहे. मात्र ती झाली नाही. जातीय तेढ निर्माण होईल, असा प्रचार झाला आहे. आता लोकसभेची निवडणूक संपली आहे. मतदान प्रक्रिया शांततेत झाली आहे. पण आणखी पाच महिन्यांनी विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत पुन्हा जात-पात-धर्मावर प्रचार होता कामा नये. जिल्ह्यातील सामाजिक सलोखा अखंड राहणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने दक्षता घेणे आवश्यक आहे. अन्यथा नव्या सामाजिक दुहीला प्रारंभ होण्याची दाट शक्यता आहे.

Leave a Comment