नाशिक |प्रतिनिधी
गुजरात राज्याला नाशिक जिल्ह्याची सीमा लागून आहे. येथून मोठ्या प्रमाणात मद्य, रोकड येण्याची शक्यता लक्षात घेता या ठिकाणी चेकपोस्ट उभारण्यात आला आहे. याच चेक पोस्टवर एका वाहनातून १८ लाख ९० हजार ९७० रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
भरारी पथकाने पेठ तालुक्यातली पिंठुंदी नाका या ठिकाणी शनिवारी पहाटे सुरतहून येणारी क्रेटा (एम.एच.15, जीआर.4007) या वाहनाची तपासणी केली असता त्यात ही रोकड सापडली.वाहनात विनायक खरात व प्रदीप शेटे (रा.चांदोरी, ता.निफाड) हे दोघे आढळून आले आहेत. गुजरात सिमेजवळील हा भाग दिंडोरी लोकसभा मतदारसंघात मोडतो.
निवडणुकीत मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसा, मद्य याचा वापर होऊ शकतो हे लक्षात घेता निवडणूक आयोगाने भरारी पथके कार्यन्वित केली आहे.आज (दि.७ एप्रिल ) पहाटे ही कारवाई केली. तसेच आयकर विभाग या प्रकरणाची अधिकची चौकशी करत आहे. दरम्यान, इतक्या मोठ्या प्रमाणात ही रोकड निवडणुकीसाठीच वापरली जाणार होती, अशी शंका उपस्थित होत आहे.निवडणूक आयोगाच्या या भरारी पथकाने महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पिठुंदी नाका चेकपोस्टवर धडक कारवाई करत एका वाहनातून तब्बल १८ लाख ९० हजार ९७० रुपयांची रोकड जप्त केली आहे.