हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Lonar Lake) रहस्य, चमत्कार, गुढ, जादू अशा गोष्टी फार कमी आणि क्वचितच ऐकायला मिळतात. त्यामुळे अनेक लोकांना याविषयी एक विशेष आकर्षण असते. आजपर्यंत तुम्ही अनेक गोष्टींच्या पुस्तकांमध्ये किंवा सिनेमांमध्ये अशा रंजक गोष्टी वाचल्या, पाहिल्या असतील. पण अस्तित्वात असणाऱ्या अशा अनेक गोष्टींविषयी फार कमी लोकांना माहित आहे. आपल्या देशात अशी अनेक ठिकाण आहेत जिथे विविध नैसर्गिक चमत्कार घडत असल्याचे अनेक जाणकार सांगताना दिसतात.
यांपैकी एक रहस्यमय गोष्ट महाराष्ट्रातसुद्धा आहे. त्यामुळे रहस्य किंवा गूढ शोधण्यासाठी परदेशवारी करण्याची गरज नाही. फक्त एकदा आपल्या महाराष्ट्रातील लोणार सरोवर या ठिकाणाला भेट द्या. अत्यंत रहस्यमय आणि वैज्ञानिकांनाही गूढ न उकललेलं हे सरोवर आपल्या महाराष्ट्रात आहे. ज्याविषयी काही रंजक गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत
५०,००० वर्षांपूर्वी तयार झालेले लोणार सरोवर (Lonar Lake)
भारतातील महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर हे अत्यंत अद्भुत आणि चमत्कारिक आहे. निसर्गाची किमया पाहायची असेल तर एकदा लोणार सरोवर या ठिकाणी जरूर भेट द्यावी. पृथ्वीवरील अत्यंत रहस्यमय ठिकाणांपैकी एक म्हणून लोणार सरोवरकडे पाहिले जाते. असे म्हणतात की, पृथ्वी आणि अंतराला जोडणारा हा एक नैसर्गिक चमत्कार आहे. हे सरोवर सुमारे ५० हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे तयार झाले होते. त्यामुळे हे सरोवर अग्निजन्य खडकात निर्माण झाले आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण जगभरात हे एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे.
उल्कापातातून निर्मिती
महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे अद्वितीय आणि रहस्यमय नैसर्गिक आश्चर्य आहे,असे म्हणायला काही हरकत नाही. कारण लोणार सरोवराची निर्मिती ही उल्कापातामुळे झाली होती. सुमारे ४७ ते ५० हजार वर्षांपूर्वी हे लोणार सरोवर तयार झाल्याचे अनेक संशोधकांचे म्हणणे आहे. (Lonar Lake) एक महाकाय उल्का दख्खनच्या पठारावर धडकल्याने इथे १.८ किलोमीटर व्यासाचा आणि १५० मीटर खोल असलेला प्रचंड मोठा खड्डा तयार झाला. हा खड्डा आज लोणार सरोवर म्हणून ओळखला जातो. या सरोवराला प्राचीन आणि पौराणिक महत्त्व आहे. या सरोवराची अलेक्झांडरनेसुद्धा नोंद घेतली होती. इतकेच नव्हे तर आईने अकबरी, पद्मपुराण आणि स्कंद पुराणातसुद्धा लोणार सरोवराचा उल्लेख आहे.
एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर
लोणार सरोवराची निर्मिती ही उल्कापातापासून झाली असून चंद्रावरील मातीचे आणि या सरोवरातील खाऱ्या पाण्याचे अत्यंत जवळचे नाते आहे, असे संशोधनातून सिद्ध झाले आहे. या सरोवराचा अनेक वैज्ञानिकांनी विविध पद्धतीने अभ्यास केला. अनेकांनी वेगवेगळे नमुने देखील सादर केले. (Lonar Lake) आजही लोणार सरोवरातील परिसरात सतत पुरातत्व, भूगर्भीय आणि अंतराळ दृष्ट्या संशोधन केले जाते. या ठिकाणी विविध प्रकारचे मात्र दुर्मिळ असे खडक सापडतात. तसेच पाण्यावर तरंगणारे दगड आणि खनिजेदेखील सापडल्याची नोंद आहे.
सरोवराच्या पाण्याचे रहस्य
लोणार सरोवर हे जगातील एकमेव खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. या सरोवराच्या पाण्यात आढळणारे क्षार आणि आम्लारी गुणधर्म प्रचंड प्रमाणात आहेत. (Lonar Lake) त्यामुळे सरोवराच्या पाण्याची पीएच लेवल खूप जास्त आहे. असे असूनही सरोवराच्या एका बाजूला छोट्याशा खड्ड्यात गोड पाणी आढळते. महत्त्वाचे असे या पाण्यात कुठलाही जीव जगू शकत नाही. परंतु याच पाण्यात विविध प्रकारचे जिवाणू, विषाणू आणि हरित शेवाळ दिसून येतात. याबाबत अनेक वैज्ञानिकांनी अभ्यास केला मात्र कुणालाच याचे रहस्य आजपर्यंत उलगडता आलेले नाही.
सासु सुनेची विहीर
लोणार सरोवराच्या येथे एक पुरातन विहीर आहे. ही विहीर ‘सासू- सुनेची विहीर’ म्हणून प्रसिद्ध आहे. या विहिरीचे अर्धे पाणी गोड तर अर्धे पाणी खारट आहे. इथे संपूर्ण सरोवरात खारट पाणी असतानासुद्धा या विहिरीतील अर्धे पाणी गोड लागते. त्यामुळे अर्ध्या गोड्या आणि अर्ध्या खाऱ्या पाण्याची ही विहीर निसर्गाच्या चमत्काराचा एक भाग असल्याचे म्हटले जाते. आता या विहिरीतील खारे पाणी सासू का सून ते काही नक्की सांगता येणार नाही. पण ही विहीर नैसर्गिक किमयेचा मोठा पुरावा नक्कीच आहे. (Lonar Lake)