हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भगवान श्रीराम मुस्लिम होते असं बेताल विधान तृणमूल काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आणि माजी मंत्री मदन मित्रा यांनी केल्याचा आरोप भाजपने केला आहे. मदन मित्रा यांच्या या विधानावरून सर्वच स्तरावर टीकेची झोड उठत असून विरोधकांना आयते कोलीत मिळालं आहे. भाजपने ट्विट करत मदन मित्रा याना कडक शब्दत खडेबोल सुनावले आहेत. मदन मित्रा यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांना आता विरोधकांना तोंड द्यावे लागणार आहे.
नेमकं काय घडलं?
बंगाल भाजपने त्यांच्या एक्स हँडलवर उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील कामरहाटीचे आमदार मदन मित्रा यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आणि तो हिंदू भावनांचा अपमान असल्याचे म्हटले. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मित्रा एका सार्वजनिक सभेत प्रभू श्रीराम यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी करताना ऐकू येतात. ज्यामध्ये तृणमूल काँग्रेसचे आमदार भगवान राम मुस्लिम असल्याचा दावा करतात. या विधानामुळे भाजप संतापली आहे.
भाजपने एक्सवर व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, “हा आपल्या संस्कृती आणि इतिहासाचा नेहमीच केलेला अपमान आहे.” हा बेकायदेशीर बांगलादेशींना स्पष्ट संदेश आहे की तृणमूल काँग्रेस हा सर्वात “हिंदूविरोधी” पक्ष आहे आणि म्हणूनच त्यांच्या श्रद्धांचे प्रतिनिधित्व करतो. भाजपनेही टीएमसीला मित्रा यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे आव्हान दिले.
दुसरीकडे, सत्ताधारी टीएमसीने त्यांच्या आमदारांच्या कथित वक्तव्यापासून स्वतःला लांब ठेवलं आहे. टीएमसीचे प्रवक्ते कुणाल घोष म्हणाले, “आपल्या सर्वांना रामायण आणि अयोध्याबद्दल माहिती आहे आणि मदन मित्रा काय म्हणत आहेत यावर आम्हाला भाष्य करायचे नाही. दरम्यान, मदन मित्रा यांच्या जवळच्या सूत्रांचा दावा आहे की हा व्हिडिओ खोटा, बनावट आणि AI द्वारे तयार केलेला आहे.
मदन मित्रा हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे जवळचे आहेत. शारदा चिट फंड घोटाळ्यात त्यांचे नाव आरोपी म्हणून होते. या घोटाळ्यात सीबीआयने त्यांना अटक केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या अटकेमागे भाजपचा कट असल्याचा आरोप केला. त्यानंतरही ते अधून मधून सतत कोणत्या ना कोणत्या विधानामुळे वादात अडकले होते. आता भाजपने त्यांच्यावर श्रीराम बद्दल आक्षेपार्ह विधान केल्याचा आरोप केला आहे.




