ऑनलाईनमुळे वंचितांचे शिक्षण झाले ऑफलाईन, शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला होणार ‘ फुटकी पाटी आंदोलन’

पुणे प्रतिनिधी | कोरोना या साथीने जगभर कहर केला आहे आणि या साथीला आटोक्यात आणण्याचा रामबाण उपाय समजून सतत टाळेबंदी केली जात आहे. यामुळे गरीब, दलित व कष्टकर्‍यांचा जगण्याचाच प्रश्न निर्माण झाला आहे. यातच या घटकातील विद्यार्थ्यांसमोर शिक्षण कसे घ्यायचे हा प्रश्न ‘आ’ वासून उभा आहे. कारण ऑनलाईन शिक्षण हा सध्याच्या शिक्षण पद्धती मधील परवलीचा शब्द आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे या प्रकारचे शिक्षण घेण्याचे उपाय या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे नैराश्य येऊन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचे वृत्तही येत आहे. मुळात या उपायाबद्दलच अनेक प्रश्न उपस्थित होतात. शिवाय कोविडोत्तर परिस्थितीत शिक्षण घेण्या वा देण्यासाठी एवढा एकच उपाय आहे का ? या प्रश्नांची उत्तरे न मिळता वरील घटकातील विद्यार्थ्यांची ऑनलाईन शिक्षण पद्धतीतून गळती होत आहेत. एक प्रकारे या पद्धतीतून ते ऑफलाईन होत आहेत. खेदाची बाब अशी की या गंभीर विषयाची शासन प्रशासन पुरेशा गांभिर्याने दखल घेत नाही. याबाबत जुलैपासून नेक वेळा दिलेल्या निवेदनाची साधी पोहोचही दिली गेली नाही. टाळेबंदीने मारले आणि ऑनलाईनने झोडपले आता तक्रार कुणाकडे करायची, हा सवाल या विद्यार्थ्यांपुढे आता उभा राहिला आहे. या सवालाचा जबाब मागण्याचा निर्णय पुरोगामी पक्ष संघटनांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजसेवक डॉ.बाबा आढाव होते. याची सुरुवात पुणे शहरातील मुलांच्या शिक्षणाची वैधानिक जबाबदारी असलेल्या पुणे मनपा ला प्रश्न विचारून होणार आहे. त्यासाठी शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला दु. 3 वा. पुणे मनपासमोर पुरोगामी पक्ष संघटना संयुक्त कृती समितिच्या वतीने ’फुटकी पाटी आंदोलन’ होत आहे.

पुणे महानगरपालिकेत शाळांत गरीब, दलित व कष्टकरी घटकातील विद्यार्थी बहुसंख्येने आहेत. सध्याच्या कोरोनात्तर काळात अपरिहार्य भासवले जात असलेल्या ऑनलाईन शिक्षणाशी आर्थिक, तांत्रिक इ. सर्व संदर्भात जुळवून घेताना उच्च व मध्यमवर्गीय विद्यार्थी व पालकांचीही तारांबळ उडत आहे. तर शिकणाऱ्या वरील पार्श्वभूमी असणाऱ्या विद्यार्थ्यांचे काय होत असेल याचा विचार केला पाहिजेच. त्यांच्या अडचणींचे प्रत्यक्ष निरीक्षण, विश्लेषण समितीतील संघटना करत आहेत. त्यांना मदतही करत आहेत. त्यातून अनेक बाबी प्रकर्षाने लक्षात येत आहेत.

पुणे महानगरपालिकेच्या परिपत्रकानुसार शाळांतील शिक्षक ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा प्रयत्न होत आहे. त्याविषयी आम्हांला ज्या बाबी आढळून आल्या. त्या आंदोलनाच्या वेळी मनपा पदाधिकारी व प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या जातील. तसेच याविषयी काय उपाय योजना असू शकेल. याबद्दलही निवेदन दिले जाईल. संविधानाच्या प्रास्ताविकेतील ‘दर्जाची व संधीची समानता’ सध्याच्या काळातील शिक्षण घेतानाही कष्टकरी, गरीब, दलित समाजातील विद्यार्थ्यांना मिळावी. अशी आग्रही मागणी यावेळी केली जाईल. ऑनलाईन शिक्षणात अडचणी येणारे काही विद्यार्थी व पालकही आंदोलनात सहभागी होतील. समितीच्या बैठकीला समितीचे निमंत्रक नितिन पवार, भीम छावा संघटनेचे शाम गायकवाड, हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे, लोकायतच्या मंगल निकम, समाजवादी अध्यापक सभेचे प्रा. शरद जावडेकर, अ. भा. बहुजन सेनेचे निलेश वाघमारे, गोखलेनगर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या उषाताई नेटके आदी उपस्थित होते. तसेच समितीच्या फुटकी पाटी आंदोलनाच्या निर्णयाला राष्ट्र सेवा समूहाचे राहूल पोकळे, स्वराज अभियानाचे इब्राहिम खान यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

You might also like