औरंगाबाद | ऑनलाईन झुगारा मध्ये अडीच लाख रुपयाची रक्कम हरल्यामुळे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास उघडकीस आली. राजेश सुभाष प्रसादसाहू, वय – 30 (रा. पळशी, मुळगाव खंडवा नर्मदानगर, मध्यप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबद्दल सविस्तर वृत्त असे की, राजेश हा सहा महिन्यांपूर्वी कामाच्या शोधात कुटुंबियांसह शहरात आला होता. त्याने समृद्धी महामार्गावरील वाहनांवर चालक म्हणून काम सुरू केले तो पळशी येथील भुजंगराव पळसकर यांच्याकडे भाड्याने राहत होता.
त्याला ऑनलाइन जुगार खेळायचा नाद असल्याने घराच्या गच्चीवर जाऊन तो नियमित मोबाईलवर गेम खेळायचा.
या गेममध्ये मोठी रक्कम हरल्यामुळे राजेश आत्ता तणावात होता. यामुळे त्याने मध्यरात्री गच्चीतील जिन्यात असलेल्या सळईला दोरीने गळफास घेतला. हा प्रकार त्याच्या पत्नीला समजताच पत्नीने त्याला घाटीत दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याबाबत चिकलठाणा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.