औरंगाबाद | प्यार हमारा अमर रहेगा म्हणत विवाहित प्रेमी युगुलाने एकाच साडीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना काल सकाळी दहाच्या सुमारास जटवाडा रस्त्यावरील एकतानगरात उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या घटनेतील प्रेयसी ही प्रियकरापेक्षा आठ वर्षांनी मोठी आहे. सीमा ईश्वर कांबळे (३५, रा. एकतानगर) आणि सचिन गंगाधर पेटारे (२७, रा. एन-१३, वानखेडेनगर, हडको) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमी युगुलाची नावे आहेत.
या प्रकरणा संदर्भात नातेवाइकांनी माहिती देताना सांगितले की, वानखेडेनगरातील सचिन पेटारे हा प्लंबिंग आणि बांधकामाच्या ठिकाणी मजुरीची कामे करत असे, तर सीमा हिचा पती एका गॅस एजन्सीवर कामाला आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वीच सचिनचा विवाह झाला. तर सीमा ही गृहिणी होती. सचिनची सीमाच्या पतीमार्फत तिच्याशी ओळख झाली होती. या ओळखीतून दोघांचे प्रेम जुळले होते. त्यांचे हे प्रेमप्रकरण सीमाच्या पतीला आणि सचिनच्या आई, बहिणीला माहिती होते. मात्र, सचिनची पत्नी या प्रेमप्रकरणापासून अनभिज्ञ होती. सचिन आणि सीमा नेहमी एकमेकांना भेटायचे.
सचिन हा काम केलेले पैसे कधीही घरी देत नव्हता. त्याची आई भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करते. एक बहीण सातारा परिसरातील रुग्णालयात कामाला आहे. तर धाकटी बहीण आणि भाऊ शिक्षण घेतात. त्याच्या वडिलांना अर्धांगवायूचा आजार आहे. तसेच सीमाला एक मुलगी आणि दोन मुले आहेत. सचिन आणि सीमाला यापूर्वी त्यांच्या नातेवाइकांनी हे प्रेमप्रकरण थांबवा, अशी समज दिली होती. मात्र, दोघेही एकमेकांना सोडायला तयार नव्हते. अखेर मंगळवारी (ता.१०) सकाळी दोघांनी एकाच साडीने छताच्या हुकाला गळफास घेतला. हा प्रकार शेजारी राहणाऱ्या तरुणांच्या निदर्शनास आला. त्यांनी तत्काळ दोघांना बेशुद्धावस्थेत घाटीत दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद हर्सूल पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात –
सीमा आणि सचिन यांच्या प्रेमप्रकरणाची माहिती तिच्या पतीसह त्याच्या कुटुंबीयांना देखील होती. मात्र ही बाब सचिनच्या पत्नीपासून लपवून ठेवण्यात आली होती. दोघांनी आत्महत्या केल्यानंतरच हा प्रकार सचिनच्या सासरच्या मंडळींना कळाला. दोघांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.