सातारा जिल्ह्यात 51 गावात लम्पी स्किनचा प्रादुर्भाव, 12 जनावरांचा मृत्यू
सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात दिवसेंदिवस लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. जिल्ह्यात 51 गावांमधील 232 जनावरांना लम्पी स्कीनची बाधा झाली असून आतापर्यंत 12 जनावरांचा लम्पी आजाराने मृत्यू झाला. सध्या आवश्यक असलेल्या लसीकरणांसाठी लस उपलब्ध झाल्याची माहिती पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यात आजपर्यंत 55 जनावरे उपचाराने बरी झाली आहेत. तर 155 जनावरांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात 1 लाख 10 हजार 976 जनावरांवर लसीकरण करायचे आहे. पशुसंवर्धन विभागाकडे 1 लाख 31 हजार 900 लस उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील 63 हजार 209 जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.
रविवारी फलटण तालुक्यातील जिंती येथे 2 गाई आणि खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे एका बैलाचा लम्पी स्किनमुळे मृत्यू झाल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर अंकुश परिहार आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर संजय शिंदे यांनी दिली आहे.