कराड | न्यूझीलंडमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून युवकाला तब्बल 27 लाख 82 हजाराला गंडा घालण्यात आला. कराड शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विरवडे, (ता. कराड) येथील दिलीप सदाशिव धोकटे या युवकाने फिर्याद दिली आहे. डेव्हीड फ्रिज गेराल्ड व एडन झेवियर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विरवडे येथील दिलीप धोकटे हा युवक गत सात वर्षांपासून नायजेरियातील एका कंपनीत ऑनलाईन पद्धतीने सप्लाय चेन मॅनेजर म्हणून काम करतो. विविध क्षेत्रात काम करण्याची आवड असल्यामुळे त्याने एका वेबसाईटवर नोकरी संदर्भाने त्याचा बायोडाटा टाकला होता. 2 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी दिलीपच्या मेल आयडीवर मेल आला. त्यामध्ये न्यूझीलंडमधील एका कंपनीसाठी दिलीपला विचारणा करण्यात आली होती. तसेच कागदपत्रे मागितली होती. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी त्याला फोन आला. समोरील व्यक्तीने त्याचे नाव डेव्हिड गेराल्ड असल्याचे सांगून त्याची मुलाखत घेतली. तसेच त्याला कंपनीचे जॉब लेटर आणि न्यूझीलंड सरकारच्या सही शिक्क्यानीशी असलेले एम्प्लॉयमेंट परमिशन लेटरही पाठवले.
दरम्यान, डेव्हिड गेराल्ड या व्यक्तीने दिलीपला पुढील कार्यवाहीसाठी नवी दिल्लीत असलेल्या न्यूझीलंड परराष्ट्र दूतामध्ये एडन झेवियर या व्यक्तीशी संपर्क करण्यास सांगितले. संबंधिताशी संपर्क झाल्यानंतर त्या व्यक्तीने ही नोकरी न्यूझीलंड सरकारची कायदेशीर नोकरी असल्याचे भासवत ही नोकरी तुम्हालाच मिळणार, अशी खात्री दिली. त्यानंतर वेळोवेळी वेगवेगळ्या कारणास्तव दिलीपला ऑनलाईन पैसे पाठविण्यास सांगण्यात आले. त्यानुसार तब्बल 27 लाख 82 हजार रुपये ऑनलाईन पाठवले. मात्र, डिसेंबर महिना अखेरपर्यंत संबंधितांकडून नोकरीबाबत केवळ टोलवाटोलवी होत असल्याने आणि वारंवार पैशाची मागणी केली जात असल्यामुळे दिलीपला संशया आला. त्याने नवी दिल्लीतील न्यूझीलंड उच्च आयोगाशी संपर्क साधला. त्यावेळी तेथून त्याला न्यूझीलंड इमिग्रेशन कार्यालयाशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले. त्यानुसार दिलीपने त्याठिकाणी संपर्क केला असता अशी कोणतीही कार्यवाही न्यूझीलंड देशाकडून झाली नसल्याचे सांगण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर दिलीप धोकटे याने याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक मारुती सराटे तपास करीत आहेत.