सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
दहिवडी येथील महा- ई- सेवा व सेतु सुविधाचे कामकाज चालवणार्या महा आयटी सर्व्हर सतत तांञिक बिघाड निर्माण होत असल्याने मागील आठवड्याभरापासुन येथील महा- ई -सेवा केंद्राची सेवा ठप्प झाली. गेल्या सहा दिवसापासून सर्व्हरमुळे दाखले मिळण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.
नुकताच दहावी- बारावीच्या परिक्षेचे निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थी अन् त्यांचे पालक आता पुढील महाविद्यालयीन प्रवेशाच्या मागे लागले आहेत. यासाठी विविध प्रकारच्या दाखल्यांची आवश्यकता असल्याने ते काढण्यासाठी पालक वर्गाची तहसील कार्यालयात धावाधाव होत आहे. अर्ज केल्यानंतर त्याची आॅनलाईन नोदंणी करण्यासाठी महा ई सेवा केंद्रात जावे लागते. या ठिकाणी आधीच गर्दी असताना सर्व्हरची गती मंदावणे आणि सर्व्हर डाऊन असल्याचे कारणे देत असल्याने पालकांना दाखले मिळविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जवळपास सर्वच दाखले आॅनलाईन पध्दतीने उपलब्ध होत आहेत. परंतु या साठी सर्व्हरचा सतत तांञिक बिघाड होत असल्याने विद्यार्थी व पालक वर्गाची मोठी गैरसोय होत आहे.
सेतु केंद्रावर दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांची गर्दी
दहावी-बारावीनंतर वैद्यकीय अभियांञिकी तसेच इतर शाखांमध्ये जाण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी सुरु आहे. यात ज्या ठिकाणी प्रवेशप्रक्रिया आहे त्या ठिकाणी लागणारे दाखले व प्रतिज्ञापञ याची जुळवाजुळव करण्यासाठी येथील सेतु केंद्रावर विद्यार्थ्यांची रांगा लागल्याचे पहायला मिळत आहे.
सर्व्हरच्या नावाने शिमगा
एकाचवेळी शासकीय संकेतस्थळावर अधिक लोड वाढत असल्याने त्याचा वेग मंदावत आहे. यातुनच अर्ज सबमिट करताना वेळ लागत असल्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.