Tuesday, February 7, 2023

महाबळेश्वर अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण : शिवसेना नेत्याच्या 2 मुलांसह प्रतिष्ठित 11 जणांवर गुन्हा

- Advertisement -

पाचगणी |  महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याबाबप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड (वय -30) व आशुतोष मोहन बिरामणे (वय -22 रा मुन्नवर हौ.सोसा,महाबळेश्वर) याना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर गुरुवारी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये महाबळेश्वर नगरीचे माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नेते डी. एम. बावळेकर यांचे दोन सुपुत्र सनी बावळेकर व योगेश बावळेकर यांचादेखील समावेश असल्यामुळे महाबळेश्वरमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, महाबळेश्वर परिसरात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर सागर व आशुतोष यांनी तिच्याशी तिच्या इच्छेविरुद्ध व संमतीशिवाय शरीरसंबंध केले. त्यामध्ये पीडित मुलगी ही गरोदर राहिली व 13 सप्टेंबरला घरीच या मुलीची प्रसूती झाली. त्यानंतर या नवजात मुलीच्या जन्माबाबतची माहिती लपवण्याचा हेतूने नवजात मुलीस मुंबई येथील चौरसिया कुटुंबियांना देण्यात आली. याप्रकरणाची महाबळेश्वर शहरात गेली काही दिवस चर्चा सुरु होती. मात्र तिनंच दिवसांपूर्वी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ शितल जानवे -खराडे यांना अज्ञात खबऱ्याकडून मिळालेल्या माहिती वरून त्यांनी तातडीने या प्रकरणात स्वतः लक्ष घालून तपास सुरु केला. या अल्पवयीन पीडितेसह तिच्या नातेवाईकांना विश्वासात घेत न्याय मिळवून देण्याचा विश्वास दिला. या पीडित मुलीने व तिच्या कुटुंबियांनी सर्व हकीकत उपविभागीय अधिकारी डॉ.शितल जानवे यांना सांगितली. त्यांनी व पो.नि.संदीप भागवत यांच्या प्रयत्नाने अखेर पीडित मुलीच्या आईने महाबळेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड व आशुतोष मोहन बिरामणे याना पोलिसांनी ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. या दोघांना पोलिसांनी सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

- Advertisement -

महाबळेश्वर पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या प्रकरणामध्ये आणखी काहींचा सहभाग असल्याने याबाबतचा तपास सुरु केला होता. दरम्यान पीडित अल्पवयीन मुलगी ही गरोदर असल्याचे माहित असून देखील तिची प्रसूती प्रक्रिया घरी करून याची माहिती लपवून दत्तक मूल देण्यात संमती दिल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या कुटुंबातील एका सदस्यावर देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबरोबरच सनी उर्फ सत्चित दत्तात्रय बावळेकर रा. महाबळेश्वर याने नवजात मुलीच्या जन्माची माहिती लपवण्याच्या हेतूने दत्तक पत्रासाठी स्वतःच्या नावाचा बॉंड विकत घेण्याबरोबरच नवजात मुलगी दत्तक घेणाऱ्यांचा शोध घेऊन गुन्हा लपविण्याचा हेतूने संशयिता आरोपीना सहकार्य केले आहे. सनी बावळेकर याने त्याचा मित्र आनंद हिरालाल चौरसिया यांच्या मध्यस्थीने सुनील हिरालाल चौरसिया (दत्तक पिता) व पूनम सुनील चौरसिया (दत्तक आई ) रा. कांदिवली मुंबई याना नवजात मुलगी दत्तक प्रक्रियेचा अवलंब न करता दत्तक देण्यात आले. यातील संशयित योगेश दत्तात्रय बावळेकर (रा महाबळेश्वर ),मंजूर रफिक नालबंद अनुभव कमलेश पांडे यांनी नवजात मुलगी कोणत्या प्रकारे व कोणत्या परिस्थितीत जन्मलेली आहे. याबाबतचे परिपूर्ण ज्ञान असताना देखील माहिती लपवून हॉटेल सनी,महाबळेश्वर येथे दत्तक पत्र करताना समक्ष हजर राहून दत्तक पत्रावर साक्षीदार म्हणून साह्य केल्या. तर संजयकुमार जंगम यांनी धार्मिक विधीचे पौराहित्य करून दत्तक पत्रावर सही केली आहे. नवजात बालक हे अनैतिक संबंधातून झालेले आहे. तसेच नवजात बालकाची आई अल्पवयीन आज याबाबतची माहिती असताना देखील आपापसात संगनमत करून गुन्ह्याची माहिती लपविण्याचा हेतूने बालक दत्तक प्रक्रियेचा अवलंब न करता दत्तक दिले व घेणाऱ्याने घेऊन सहकार्य केले. ऍडव्होकेट नोटरी म्हणून काम करणारे घनशाम फरांदे (रा. तामजाई नगर सातारा) याने नवजात बालक हे चौरसिया कुटुंबियांना देण्यात नोटरी करून गुन्ह्यात सहकार्य केले. तर ऍड. प्रभाकर रामचंद्र हिरवे (रा महाबळेश्वर) हे वकील म्हणून काम करत असून त्यांनी या बालकास दत्तक देण्यात सहकार्य केले आहे.

नवजात बालकाच्या दत्तक प्रक्रियेमध्ये सहभागी असल्याने १) पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबातील एक सदस्यांसह २) सनी उर्फ सत्चित दत्तात्रय बावळेकर रा महाबळेश्वर ३) योगेश दत्तात्रय बावळेकर रा महाबळेश्वर ४) आनंद हिरालाल चौरसीया रा कांदिवली मुंबई ५)सुनिल हिरालाल चौरसीया रा कांदिवली,मुंबई ६) पूनम सुनील चौरसिया रा कांदिवली,मुंबई ७) संजयकुमार जंगम रा महाबळेश्वर ८) मंजुर रफिक नालबंद रा.महाबळेश्वर ९) अनुभव कमलेश पांडे रा उत्तर प्रदेश सध्या महाबळेश्वर १०) घनश्याम फरांदे रा. तामजाई नगर सातारा ११) ऍड. प्रभाकर रामचंद्र हिरवे रा महाबळेश्वर अश्या एकूण 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आतापर्यंत चौघांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नी. संदीप भागवत,पोलीस उपनिरीक्षक अब्दुल बिद्री करीत आहेत.