सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाबळेश्वर प्राथमिक शाळेमागील चाळीत बुधवार 1 सप्टेंबर रोजी पतीने स्वतःच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. या दुर्दैवी घटनेत पत्नी भाजून जखमी झालेली होती. जखमी महीलेवर मुंबईतील कस्तुरगा गांधी रूग्णालयात उपचार सुरू होते, परंतु घटनेच्या आठ दिवसांनी या महीलेचा मृत्यु झाला असून तिच्यावर महाबळेश्वर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान आरोपी असलेला नराधम पती अद्याप मोकाट फिरत असल्याने पोलिसांच्या कायर्क्षमतेबाबत शहरातून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
महाबळेश्वरमधील व्हॅली वह्यु रोड वरील शाळा क्रमांक एकच्या इमारती मागील चाळीत राजेंद्र जाधव (वय- 55) हा घोडे व्यवसायिक रहात होता. या घोडेवाल्याने 1 सप्टेंबर रोजी सकाळी आपली पत्नी शौचालया वरून परत घरी येत असताना तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवुन दिले होते. पत्नीला जळत्या अवस्थेत टाकून पती घटना स्थळावरून पळून गेला. तेव्हा चाळीतील रहीवाशांनी प्रसंगावधान राखून त्या महीलेल्या अंगावर पाणी टाकून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहीवाशी आणि दुर्दैवी महीलेच्या मुलांनी तिला येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी सातारा व नंतर मुंबई येथे त्या महीलेला हलविण्यात आले. मुंबई येथे गेली 8 दिवस त्या महीलेची मृत्युशी झुंज सुरू होती. शेवटी बुधवारी दि. 8 सप्टेंबर रोजी त्या महीलेचा उपचारा दरम्यान रूग्णालयात मृत्यु झाला.
दरम्यान या घटनेतील मुख्य आरोपी असलेला घोडेवाला राजेंद्र जाधव हा अद्याप महाबळेश्वर पोलिसांच्या हाती लागला नाही. प्रारंभी आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांनी तीन पथके वेगेवगळया गावाला पाठविली होती. पंरतु ही तीनही पथके एका दिवसात तपास करून रिकाम्या हाताने परत आली. त्यानंतर आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी काही खास प्रयत्न केला नसल्याचा आरोप आता शहरातील नागरीक करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी स्वंतत्र कुमक महाबळेश्वर पोलिस ठाण्यात तैनात करावी, अशी मागणी महाबळेश्वर येथील नागरीक करीत आहेत.