कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
महाबळेश्वर नगरपालिकेतील विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी पालिकेच्या ऑन लाईन सर्वसाधारण सभेला दांडी मारल्याने नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांना कोरम अभावी सभा तहकुब करावी लागली. ही सभा तहकुब न करता रद्द् करण्यात यावी अशी सुचना मुख्याधिकारी यांनी केली होती. परंतु मुख्याधिकारी यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष करून नगराध्यक्षांनी ही सभा तहकुब करण्याचा निर्णय घेतला. आता ही सभा आज दुपारी साडेतीन वाजता आयोजित करण्यात आली आहे. मागील सभा देखिल कोरम अभावी तहकुब करण्यात आली होती.
नगराध्यक्षांच्या मनमानी कारभारामुळे पालिकेतील सत्ताधारी गटात फुट पडल्याने गेली काही महीने पालिकेतील सत्ताधारी गट अल्पमतात आला आहे. त्या मुळे नगराध्यक्षांना पालिकेचे कामकाज करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. 31 मार्च रोजी आयोजित केलेली ऑन लाईन सर्वसाधारण सभा देखिल कोरम अभावी तहकुब करण्यात आली होती. तहकुब केलेली ती सभा नगराध्यक्षांनी 1 एप्रिल रोजी आयोजित केली होती. या सभेविरोधात मुख्याधिकारी पल्लवी पाटील व विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांचे कडे धाव घेतल्याने जिल्हाधिकारी यांनी त्या सभेत झालेल्या ठरावांच्या अंमजबजावणीस स्थगिती दिली होती.
आता पुन्हा आज आयोजित केलेल्या सर्वसाधारण सभा ही कोरम अभावी तहकुब करण्यात आल्याने त्याच तिकिटावर तोच शो पुन्हा सुरू झाला आहे. कोरम अभावी ही सभा तहकुब न करता रद्द् करावी अशी सुचना मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी 31 मार्च रोजीच्या सभेत देखिल केली होती परंतु मुख्याधिकारी यांनी केलेल्या सुचनेकडे नगराध्यक्षांनी दुर्लक्ष केले होते. ही सर्वसाधारण सभा तहकुब न करता रद्द् करण्यात यावी अशी सुचना मुख्याधिकारी यांनी केली परंतु मागील वेळे प्रमाणे याही वेळी मुख्याधिकारी यांच्या सुचने कडे नगराध्यक्षांनी दुर्लक्ष केले. त्या मुळे पुढील घटना क्रम पुन्हा त्याच मार्गाने सुरू राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोरम अभावी सभा तहकुब करून ती सभा पुन्हा 1 एप्रिल रोजी घेवुन विरोधकांना शह देण्याचा प्रयत्न अल्पमतातील सत्ताधारी गटाने केला होता. तसाच प्रयत्न याही वेळेला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या मुळे मागील वेळे प्रमाणे या सभेबाबत मुख्याधिकारी व विरोधी गटातील 13 नगरसेवकांना जिल्हाधिकारी यांचे कडे धाव घ्यावी लागणार आहे.
आजच्या सभेत विषय पत्रिकेवर मागील सभेचे कामकाज वाचुन कायम करणे हा पहीला विषय होता. या विषयाला विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी आक्षेप घेतला होता. पहीला विषय वगळुन सभा पुन्हा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी विरोधी गटातील नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांचेकडे केली होती. पंरतु या आक्षेपाकडे सत्ताधारी गटाने दुर्लक्ष केल्याने विरोधी गटातील 13 नगरसेवकांनी बैठक घेवुन या सभेवर बहीष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णया नुसार 13 नगरसेवकांनी या सभेला दांडी मारली. विरोधकांच्या या आक्रमक भुमिकेमुळे सत्ताधारी गटाची कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्याचे आव्हान आता सत्ताधारी गटा समोर उभे राहीले आहे.