हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मोठी घोषणा केली आहे. पुढची लोकसभा निवडणूक आपण बारामती मधून लढवणार आहे असं त्यांनी म्हंटल आहे. जानकर यांनी अकोला जिल्ह्यातील बाळापूर इथं बोलताना याबाबत घोषणा केली आहे. विशेष म्हणजे नुकतीच पार पडलेल्या निवडणुकीत जानकर यांनी परभणी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता ते पुढची लोकसभा बारामती (Baramati) मधून लढवणार.
जानकर म्हणाले, पुढच्या निवडणुकीसाठी माझी आता बारामतीसाठी तयारी सुरू आहे. बारामती लोकसभा निवडणूक मी लढणार आहे. यापूर्वी मी महाराष्ट्रातील नांदेड, सांगली, माढा, परभणी, बारामती अशा ५ मतदारसंघातून निवडणूक लढवली आहे. या पाचही ठिकाणी माझा पराभव झाला आहे. पण मतदान वाढत चाललं आहे, मतदान कमी झालं नाही. आता बारामतीत ताकदीने लढून विजयी होणार असल्याचा विश्वास महादेव जानकर यांनी व्यक्त केला.
दरम्यान, २०२४ ची लोकसभा निवडणूक महादेव जानकर यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून लढली होती. ते खरं तर महाविकास आघाडीकडून मधून निवडणूक लढवतील अशा चर्चा होत्या. मात्र ऐनवेळी जानकर यांनी महायुतीत जाऊन परभणी लोकसभा निवडणूक लढवली. परंतु त्याठिकाणी ठाकरे गटाच्या संजय बंडू जाधव यांनी जानकर यांचा दणदणीत पराभव केला. परभणी लोकसभा मतदारसंघात आपला पराभव हा मुस्लिम आणि दलित मतदार विरोधात गेल्याने झाला असं महादेव जानकर यांनी सांगितले. तसेच आता महादेव जानकर यांनी बारामती मधून पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.