Mahaelgar Andolan Nagpur : या 4 गोष्टी ठरल्या नागपूर येथील शेतकरी आंदोलनाला मारक

Mahaelgar Andolan Nagpur
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

आंदोलन (Mahaelgar Andolan Nagpur) म्हणजे एखाद्या पक्षाचा प्रचार करणं, निवडणूक लढण्याइतकं सोप्प काम नाही. कारण आंदोलन म्हटलं कि लोकांना पहिले त्यांच्यावरील अन्यायाची जाणीव करून द्यावी लागते, त्यांना तुम्ही तुमच्यावरील अन्यायाविरुद्ध लढले पाहिजे याची जाणीव करून द्यावी लागते. तसेच अन्यायाची जाणीव झाल्यावर आता त्याविरुद्ध लढायचं म्हटलं तर रस्त्यावर उतरून वेगवेगळ्या गनिमी काव्यांनी सरकारला आपलं म्हणणं ऐकून घ्यायला लावावं लागतं. सरकारने ऐकलं पाहिजे, आपल्या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत यासाठी तसा दबाव तयार करावा लागतो. एखाद्या नेत्याचं आख्ख आयुष्य आंदोलनं उभं करण्यात जातं. लढाई रस्त्यावरची असो वा सीमेवरची, डावपेच आखून, परीस्थितीचा अंदाज घेऊनच लढली जाते. एखादं आंदोलन यशस्वी करायचे असेल तर आपल्या ताकदीच, आपल्यातील कमी काय आहे अन आपण कशात स्ट्रॉंग आहोत याचा अंदाज बांधून डावपेच खेळावे लागतात. केवळ जोर आणि ताकद लावून आंदोलन यशस्वी होत नाहीत हे सत्य आहे. तसेच कोणतेहि आंदोलन केवळ आक्रमकपणा आणि भावनिकतेवर लढता येत नाही. तर आंदोलन यशस्वी करण्यासाठी गनिमीकावा करून वेवेगळ्या क्लुप्त्या, शक्कल लढवून, गरज पडली तर चार पावलं माघार घेऊन, सरकारला अडचणीत आणून, सरकारवर दबाव टाकून यशस्वी करावे लागते. आंदोलनात आंदोलनाचं जीवंत राहणं फार महत्वाचं असतं. कारण आंदोलन जिवंत राहिलं तरचं आंदोलनकर्त्यांच्या आशा जिवंत राहतात. अन आशेच्या जोरावरच जगातल्या सर्व लढाया लढल्या जातात.
आता बच्चू कडू यांच्या कर्जमाफीसाठीच्या आंदोलनाकडे आपण पाहायचे झाले तर यात काय कमी राहिल्या? कोणाचं काय चुकलं? आंदोलनाच यश अपयश मोजायचं झालं तर काय समोर येतं? यावर अगदी त्रयस्थ म्हणून चर्चा करूयात..


शेतकऱ्यांना शेतकरी म्हणून एकत्र आणण्यात बच्चू कडू यशस्वी- Mahaelgar Andolan Nagpur

सर्वात अगोदर शेतकऱ्यांना जात, पात, धर्म आणि राजकीय पक्ष बाजूला ठेऊन फक्त शेतकरी म्हणून एकत्र आणण्यात बच्चू कडू यशस्वी झाले हे आपल्याला मान्य करावे लागेल. कारण तब्बल ३५ वर्षांनंतर शरद जोशींच्या नंतर पहिल्यांदाच कोणीतरी महाराष्ट्रातील शेतकरी इतक्या मोठ्या प्रमाणात (जवळपास ५० हजार) एकत्र आणण्यात यशस्वी झाले. जाती धर्माच्या नावाने लोकांची गर्दी जमवणे सोप्प आहे, लोकांच्या भावनांना हात घालून मोर्चे, आंदोलन करणे शक्य आहे. पण फक्त शेतकऱ्यांना शेतीच्या मुद्द्यांवर गोळा करणे, पैसे न वाटता शेतकऱ्यांनी स्वखर्चाने इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी होणे हि खूप कठीण आणि विशेष बाब आहे.


बच्चू कडू सरकारसाठी रेड अलर्ट का झाले?


तब्बल ८ महिने कडू यांनी यावर काम केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग करून सुरु केलेला शेतकऱ्यांसाठीचा हा लढा पुढे हळू हळू व्यापक झाला. आमदारांच्या घरावर मशाल आंदोलन, रक्तदान आंदोलन, मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग उपोषण, राज्यभरात चक्काजामसह वेगवेगळी आंदोलने, ७/१२ कोरा कोरा कोरा यात्रा, शेतकरी शेतमजूर ते नागपूर येथे महाएल्गार आंदोलन अशी जवळपास १० हुन अधिक आंदोलने कडू यांनी केली. ८ महिन्यात साधारण २० हजार किमी प्रवास करत २०० हून अधिक सभा घेतल्या आहेत. याद्वारे साधारणपणे २५ लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग पाहायला मिळाला. ८ महिने महाराष्ट्र पालथा घालून गावगावात सभा बैठक घेऊन बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना आपण एक होऊन लढलं पाहिजे असं म्हणत शेतकरी एकजुटीचा नारा दिला. दुसरीकडे सर्व शेतकरी नेते, संघटना यांनाही एकत्र करत त्यांची मोट बांधली. इथेच बच्चू कडू सरकारसाठी रेड अलर्ट झाले. कारण सरकार काहीही पचवू शकतं पण शेतकरी फक्त शेतकरी म्हणून एकत्र येणं सरकारला सहजासहजी पचण्यासाखी बाब नाही. मैदान तयार झालं होतं, आता शेवटचा मारा करायचा होता.. Mahaelgar Andolan Nagpur


मागील ८ महिन्यात बच्चू कडू यांनी शेतकरी आंदोलनासाठी (Mahaelgar Andolan Nagpur) अगदी मजबूत मैदान तयार केले होते. शेवटचा मारा करण्यासाठी नागपूर हे ठिकाण ठरवून महाएल्गार आंदोलन २८ ऑक्टोबरपासून पुकारण्यात आले. आंदोलनवीर अशी ख्याती असणाऱ्या कडू यांनी महाएल्गारसाठी व्यवस्थित रणनीती सुद्धा आखली होती. आता नागपूरात शेवटचा मारा करायचा आणि आंदोलनातून विजय खेचून आणायचा असा कार्यक्रम आखला गेला होता. कडूंच्या दिमतीला नागपूरच्या आंदोलनात विजय जावंधिया, वामनराव चटपर, Raju Shetti, महादेव जाणकर, Ajit Nawale, @bacc a कॉ राजन क्षीरसागर, प्रकाश पोहरे, दिपकभाई केदार, प्रशांत डिक्कर आणि विठ्ठलराजे पवार आदी शेतकरी नेते सुद्धा असल्याने खऱ्या अर्थाने शेतकरी एकजूट या आंदोलनात पाहायला मिळाली. २७ तारखेला बच्चू कडू स्वतः ट्रॅक्टर घेऊन अचलपूरहून नागपूरकडे निघाले. आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी २८ ऑक्टोबरला तब्बल ४० ते ५० हजार शेतकरी आंदोलनाला जमा झाले. कोलकाता राष्ट्रीय महामार्ग अडवून आंदोलकांनी चक्काजाम करून सरकारला पहिल्याच दिवशी खिंडीत अडवले होते.


आंदोलन अगदी योग्य दिशेला असताना असं काय झालं कि समीकरणं बदलली?

आंदोलन म्हणजे एखादं युद्ध लढण्याहून लहान बाब नक्कीच नाही. कारण युद्धात आपल्याला कायम सतर्क राहावं लागतं, अनेकवेळा परिस्थिती पाहून निर्णय बदलावे लागतात, गनिमीकावा करत रणनीती आखून सावधगिरीने डाव टाकावे लागतात. आणि इतकं सर्व करून निसर्गाचीसुद्धा साथ लागते. महाएल्गार आंदोलनात असं काय घडलं कि सगळं काही अगदी व्यवस्थित सुरु असताना आंदोलन फसायला सुरवात झाली? तर आपण यासाठी कोणत्या चार गोष्टी महाएल्गार आंदोलन फसायला कारणीभूत ठरल्या ते समजावून घेऊयात..

१) तुफान पाऊस


नागपूर येथील आंदोलनाला पहिल्या दिवशी जवळपास ४० -५० हजार शेतकरी जमा झाले होते. पण पाऊसाने आंदोलनस्थळी धुमाकूळ घातला. पहिला दिवस पाऊसाची ये जा सुरु होती त्यामुळे कसाबसा गेला. मात्र २९ तारखेला संध्याकाळी पावसाने तुफान हजेरी लावली. ज्या मैदानात आंदोलन स्थळ ठरवण्यात आले होते तिथे सर्वत्र चिखल झाल्याने आंदोलकांच्यात गोंधळ उडाला. आंदोलक नेत्यांनी तयानंतर एका मंगलकार्याल्यात आंदोलकांची सोय केली. मात्र सततच्या पावसाने जाग्यावर जेवण बनवून तिथेच राहणे कठीण झाले. अशा परिस्थितीतही आंदोलक लढले. पण २९ ऑक्टोबरच्या संध्याकाळच्या पावसामुळे अनेक आंदोलक माघारी गेले. पावसामुळे पहिल्या दिवशी ५० हजार आंदोलकांची असलेली संख्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अवघ्या १० हजारांवर आली.


२) कोर्टाची नोटीस


एका बाजूला पावसाचा मारा सुरु असताना दुसरीकडे बरोबर ५:५५ वाजता कोर्टाची नोटीस आली कि महामार्ग तात्काळ रिकामा करून आंदोलन स्थळी जाऊन बसावे. आता इथेच खरी मेघ आहे, कारण तुफान पावसामुळे आंदोलन स्थळ असलेले मैदान चिखलाने भरले होते. तिथे उभे राहणे कठीण बाब असताना अशात त्या ठिकाणी १० हजार लोकांची राहणे खाणे व्यवस्था होते मुश्किल होते. हीच बाब सरकारी गुप्तहेरांनी कदाचित संबधितांपर्यंत पोहोचवली असावी. आता आंदोलक मैदानात बसू शकत नाहीत, पावसामुळे यांची संख्यापण कमी झालीय आणि कोर्टाच्या नोटीसीने जर यांना महामार्गही खाली करायला लावला तर हे जाग्यावर चेकमेट होतायत हे सरकारच्या लक्षात आले असावे. वेळ साधून ठीक ५:५५ वाजता कोर्टाची नोटीस आंदोलक नेत्यांना देण्यात आली. अशा परिस्थितीतहि माघार न घेता आम्ही जेलभरो करू असा नारा देत सर्व आंदोलक पोलीस बंदोबस्ताच्या दिशेने पायी निघाले. सरकारकडून दोन मंत्रांनी पुन्हा एकदा आंदोलक नेत्यांना मुंबईतील बैठकीचे निमंत्रण दिले. मंत्र्यांसोबत आंदोलक रस्त्यावर बसलेले असतानाहि जोरदार मुसळधार पाऊस पडत होता. आता मात्र आपल्या मागे असणारे आंदोलकांची संख्याही पावसामुळे कमी झालेली असताना आता आपण आंदोलन (Mahaelgar Andolan Nagpur) ताणून प्रशासनाला अंगावर घेऊन आंदोलन संपवण्याची संधी सरकारला द्यायची कि आंदोलन जिवंत ठेवण्यासाठी मुंबईला बैठकीला जायचे असा प्रश्न आंदोलक नेत्यांसमोर येऊन ठाकला होता.


३) गोरगरीब शेतकऱ्यांच्या भाड्याच्या गाड्या


आता हे आंदोलन गोरगरीब शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अगोदरच आपल्या अंगावरील कर्जाचे ओझे माफ व्हावे यासाठी हा शेतकरी लढतो आहे. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी झगडणाऱ्या गरीब शेतकरी भाड्याच्या गाड्या करून कसा बसा आंदोलनाला आला होता. आज २७ तारखेपासून पहिले तर तीसरा दिवस होता. वरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि दुसरीकडे भाड्याच्या गाड्या परत करायचा तगादा यात त्या शेतकऱ्याची घुसमट होत होती. आंदोलन तीन दिवस चालेल आणि सरकार आपली दाद घेईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र सरकार चालवणारे पण अति चलाख आणि संधीसाधू असल्याने त्यांनी आंदोलन पाऊसात फसणारे हे वेळेवर ओळखून आंदोलनाची दादच घेतली नाही. वरून आंदोलकांना मुंबईला बोलावून शेतकरी आणि आंदोलक यांच्यात दुफळी माजवण्याचा डाव टाकला. नैसर्गिक परिस्थिती आणि नियती यामुळे सरकारचा डाव लक्षात येउनपण मुंबईच्या बैठकीत जाऊन कर्जमाफीची तारीख जाहीर करायला लावण्याची रिस्क आंदोलकानीं घेतली.


४) पोलिसांनी बाहेरून येणारी आवक रोखल्याने नवीन आंदोलक येऊ शकले नाहीत –


जेव्हा एखादे आंदोलन रस्तावर लढले जाणार असते, ३-४ दिवस किंवा त्याहून अधिक दिवस चालणारे असते तेव्हा साहजिकच सुरवातीला सहभागी झालेल्यांपैकी अनेक आंदोलक मागे जातात अन नव्या दमाचे हळू हळू सामील होत राहतात. त्यामुळे आंदोलक माघारी गेले तरी आंदोलनस्थळावरचा उत्साह टिकून राहतो. पण नव्या दमाच्या आंदोलकांना आंदोलनस्थळी पोहोचूच दिले नाही तर मात्र पहिल्यांदा आलेले आंदोलक माघारी गेल्यानंतर त्यांची कमी भरून काढण्यासाठी कोणीच राहत नाही. हे लक्षात ठेऊन सरकारने पोलीस प्रशासनाचा वापर करून वेगवेगळ्या जिल्ह्यांतून नागपूरला आंदोलनासाठी येत असेलेल्या आंदोलकांना त्यात त्या ठिकाणीच अडवले. परिणामी २९ तारखेला रात्रीपर्यंत आंदोलन स्थळी आंदोलकांची संख्या कमी कमी होत अवघी ७-१० हजार झाली. एक आंदोलनकारी नेता म्हणून अशा परिस्थिती आपण काय निर्णय घ्यायचा हे फार महत्वाचे ठरते. नागपूरच्या आंदोलनात राजू शेट्टी, चटप, जावंधिया, नवले, कडू असे एकसेबढकर एक अनुभवी नेते होते. अशावेळी आंदोलन जिवंत ठेवणे आणि त्यातून आपली मागणी मान्य करून घेणे हेच शहाणपणाचे असते हे त्यांनी ओळखले. अगदी ३० ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत सर्व आंदोलक नेत्यांनी आंदोलनस्थळावरील परिस्थिती काही बदल होतोय का ते पहिले आणि शेवटी मुंबई येथील बैठकीला जाण्याचा निर्णय घेतला.
आजवर अशाप्रकारे आंदोलक आणि आंदोलक नेते यांच्यात गैरसमज तयार करून आंदोलने संपवण्याचे कारस्थान प्रत्येक सरकार करत असते. आपल्याबाबतही असे होऊ शकते याची कल्पनासुनही या नेत्यांनी मुंबईला बैठकीला जाण्याचा निर्णय घेतला. बैठकीत भरपूर घुमसान झाले. सुरवातीला आम्ही कर्जमाफी देऊच शकत नाही असे म्हणणाऱ्या सरकारला कर्जमाफीची तारीख जाहीर करायला या नेत्यांनी भाग पाडले. ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी जाहीर करू असे मुख्तमंत्र्यांनी जाहीर केले. आंदोलनाचे हे फार मोठे यश होते.


मात्र आंदोलक मुंबईत येऊन मॅनेज झाले, हे आंदोलन महायुतीसाठीच होते काय? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कर्जमाफीचा प्रभाव पडू नये यासाठी केलेला देखावा होते काय? कर्जमाफी आत्ताच होणे अपेक्षित होते, माघार घेतली नसती तर मंत्रिमंडळाला नागपूरला येऊन कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा लागला असता. उपोषणावेळी ३ महिन्याचे आश्वासन आणि आता ६ महिन्यांचे म्हणजे शेतकऱ्याची फसवणूक आहे, पहिल्यांदाच शेतकरी इतक्या मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाला होता. कर्जमाफी झाल्याशिवाय आंदोलन थांबायला नको होते. ४८ तासात आंदोलन संपवून शेतकरी नेते मॅनेज झाले असे अनेक फेक नॅरेटिव्ह पसरवून सत्ताधाऱ्यांनी आंदोलक आणि शेतकरी यांच्यात फूट पडण्याचा डाव टाकला आहे.
मात्र सत्ताधाऱ्यांच्या अशा गैरसमज निर्माण करणाऱ्या यंत्रणांचे बळी पडणाऱ्यांनी आंदोलकांच्या नजरेतून एकवेळ आंदोलन पाहणे फार गरजेचे आहे. कारण इंटरनेटवर काहीही अभ्यास न करता, अनुभव नसताना, रस्त्यावरची लढाई कशी लढावी लागते याची जाण नसताना केवळ सत्ताधाऱ्यांनी तयार केलेल्या फेक नॅरेटिव्हच्या घोड्यावर स्वार होऊन हवेत गोळीबार करण्याने हाती काहीच लागणार नाही. उलट यामुळे शेतकऱ्यांचे आणि आंदोलनाचे प्रचंड नुकसान होणार आहे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे कृपया तुम्हीसुद्धा यावर विचार करा. कारण एखादं आंदोलन उभं करायला लाखो लोकांची मोट बांधावी लागते, हजारो किमी प्रवास करून कित्तेक सभा मिटिंग घेऊन लोकांना एकत्र आणावं लागतं. मात्र हि एकजूट मोडायला एक फेक बातमी, एक गैरसमज पण पुरेसा ठरतो.
आदर्श पाटील
लेखक SPARK (Strategy, Planning, Analytics, Research, Knowledge) या संस्थेचे संस्थापक आहेत.