हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आगामी विधानसभा निवडणुकीत आमचं सरकार आल्यास महिलांसाठी महालक्ष्मी योजना (Mahalaxmi Yojana) आणू तसेच या योजनेच्या माध्यमातून महिलांना दर महिन्याला ३००० रुपये देऊ अशी मोठी घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. महिलांच्या सुरक्षितेची आम्ही काळजी घेऊ अशी ग्वाही सुद्धा नाना पटोले यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. बहिणाना पैसे मिळावे हीच काँग्रेसची भूमिका असलयाचे नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.
नाना पटोले म्हणाले, आम्ही लाडकी बहीण योजनेचं स्वागत केलं आहे. फक्त ती कायम राहावी अशी आमची इच्छा आहे. महिलांना त्रास होऊ नये, बँकेत जमा झालेले पैसे कट होऊ नये. आता हे लोक इव्हेंट करत आहेत. जनतेचा पैसा लुटून इव्हेंट करत आहेत. प्रसिद्धीसाठी इव्हेंटवर या सरकारने ४७० कोटी रुपये खर्च केले. पण भगिनींना बँकेत किती त्रास होत आहे हे या सरकारला माहीत आहे का? असा सवाल नाना पटोले यांनी केला. राज्यात आमचं सरकार आल्यास महिलांसाठी महालक्ष्मी योजना आणू, या योजनेच्या माध्यमातून दर महिन्याला महिलांना ३००० रुपये देऊ, इतकंच नव्हे तर दरवर्षी या रकमेत १००० रुपयांची वाढ करू अशी मोठी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे.
दरम्यान, लाडकी बहीण योजना बंद व्हावी यासाठी नाना पटोले यांचे निवडणूक प्रमुख अनिल वडपल्लीवार कोर्टात गेले असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला होता, त्यावरही नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिले आहे. अनिल वडपल्लीवार आमच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही असं नाना पटोले यांनी स्पष्ट केले. सदावर्ते जसा फडणवीस यांच्यासाठी काम करतो. मी नाव नाही घेत. फडणवीस म्हणतात ना, मी कुठे गेलो कोर्टात .तो माझा माणूस नाही असच फडणवीस म्हणतात ना. हा वडपल्लीवार आमच्या मंत्र्याचा पीएस होता. पीएस कोणीही राहू शकतो. फडणवीस यांचेही अनेक पीएस आहेत. ते पक्षाचे कार्यकर्तेच नाहीत, मग त्यांनी असं काही केलं तर फडणवीस जबाबदारी घेणार का? घेणार का जबाबदारी?”, असा सवाल नाना पटोले यांनी केला.